BCCI To Sanction Mohsin Naqvi: आशिया चषक ट्रॉफीबाबत वाद दिवसागणिक अधिक चिघळत चालला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पीसीबीचे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी आशिया चषक विजेत्या भारतीय संघाला अद्याप ट्रॉफी दिलेली नाही. भारताने जेतेपद पटकावल्यानंतर मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. पण नक्वी यांनी स्वत: ट्रॉफी देण्याचा हट्ट धरला आणि नंतर भारताने नकार देताच ते ट्रॉफी घेऊन पळून गेले. अद्यापही त्यांनी ट्रॉफी न दिल्याने बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार करत मोठं पाऊल उचललं आहे.

२०२५ च्या आशिया चषकादरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नक्वी यांच्या नाट्यमय कृतींना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पूर्णविराम देणार आहे. अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे निराश होऊन नक्वी ट्रॉफी घेऊन पळून गेले. तेव्हापासून त्यांनी यावरून बराच गोंधळ केला आहे. आशिया चषक जिंकूनही, भारतीय संघाला अद्याप ट्रॉफी देण्यात आलेली नाही. बीसीसीआयने आता यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताच्या पाकिस्तानवरील विजयानंतर, आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी अजूनही भारताला ट्रॉफी न देण्यावर ठाम आहेत.पीटीआयच्या वृत्तानुसार, ट्रॉफी ACC मुख्यालयात बंद करून ठेवण्यात आली आहे. पीसीबी प्रमुखांनी त्यांच्या परवानगीशिवाय ते काढून टाकू नये किंवा देऊ नये असे कडक निर्देश दिले आहेत.

बीसीसीआयने आधीच सांगितले आहे की ते नक्वींच्या या वर्तनाची आयसीसीकडे तक्रार करणार आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट बोर्ड नक्वींना शिक्षा देण्याचा आणि आयसीसीच्या संचालक पदावरून काढून टाकण्याचा विचार करत आहे. यापूर्वी बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आशिया चषकाची ट्रॉफी हे नक्वी यांची वैयक्तिक मालमत्ता नाही आणि त्यांनी ती लवकरात लवकर भारताला परत करावी.

पीटीआयने एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, “पीसीबी किंवा नक्वी यांच्यासाठी दीर्घकालीन परिणाम काय होतील यावर सर्वांच्या नजरा आहेत, कारण बीसीसीआयने हे स्पष्ट केलं आहे की नक्वी यांना वैयक्तिकरित्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्याचा अधिकार नव्हता. बीसीसीआयला ती पाठवण्यास नकार देऊन त्यांनी चूक केली आहे, जे या कार्यक्रमाचे अधिकृत यजमान होते.”

आठ संघांमध्ये खेळवली गेलेली ही स्पर्धा २८ सप्टेंबरला संपली, सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, जे पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत. सामन्यानंतर बक्षीस समारंभ जवळजवळ एक तास उशिरा झाला आणि अखेर भारत किंवा नक्वी दोघेही त्यांच्या भूमिकेपासून मागे हटले नाहीत. त्यामुळे विजेत्या संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही.