Bengal Cricketer Priyajit Ghosh Dies At 22 Due to Heart Attack: क्रिकेट जगतातून एक दुख:द बातमी समोर येत आहे. २२ वर्षीय युवा क्रिकेटपटूचं शुक्रवारी निधन झालं आहे. त्याच्या निधनानंतर त्याचं कुटुंब आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. युवा खेळाडू बंगालसाठी रणजी खेळण्याचे स्वप्न पाहत होता, परंतु त्याचं स्वप्न आता अपूर्ण राहिलं आहे.
बंगालचा २२ वर्षीय क्रिकेटपटू प्रियजित घोष याचे शुक्रवारी निधन झाले. प्रियजित शुक्रवारी सकाळी व्यायाम करण्यासाठी जिममध्ये पोहोचला होता. यादरम्यान, युवा खेळाडूला हृदयविकाराचा झटका आला आणि घोषचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी कळताच क्रिकेट विश्वात शोककळा पसरली.
प्रियजित हा मूळचा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील आहे. त्याचे स्वप्न रणजी ट्रॉफीमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करण्याचे होते. यासाठी तो सतत कठोर परिश्रम करत होता. त्याला वरिष्ठ स्तरावर बंगालचे प्रतिनिधित्व करायचे होते आणि भारतीय राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचे त्याचे स्वप्न होते.
बंगाल क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली. २०१८-१९ च्या हंगामात त्याने जिल्हास्तरीय १६ वर्षांखालील स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. यामुळे बंगाल क्रिकेट असोसिएशनने त्याला सन्मानित केले होते आणि त्याला पदक देखील मिळाले. प्रियजीत त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता.
प्रियजित घोषचं कसं झालं निधन?
शुक्रवारी सकाळी, १ ऑगस्टला तो बोलपूरच्या मिशन कंपाऊंड परिसरातील एका जिममध्ये व्यायामासाठी पोहोचला. तो त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घ्यायचा. जिममध्ये अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्याची तब्येत खूपच बिघडली. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं. तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि अखेर या युवा खेळाडूने हॉस्पिटमध्ये अखेरचा श्वास घेतला.
कुटुंबातील लोकांचं म्हणणं आहे की प्रियजित त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष द्यायचा. तो दररोज त्याच्या फिटनेसवर कठोर परिश्रम करायचा. हृदयविकाराची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही महिन्यांपूर्वी पंजाबमधील फिरोजपूरमध्ये एका युवा खेळाडूचा सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.