India W vs Australia W: येत्या ३० सप्टेंबरपासून भारतात आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेआधी ऑस्ट्रेलियाचा महिला संघ ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघावर भारी पडू शकतो. दरम्यान मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या महिला संघासमोर विजयासाठी २८२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजयाची नोंद केली आहे.
भारतीय संघाच्या वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीला पहिला मोठा धक्का बसला आहे. कारण भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २८१ धावा केल्या. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या प्रतिका रावलने ६४ धावांची खेळी करून दमदार सुरूवात करून दिली. तिला साथ देत अनुभवी फलंदाज स्म्रिती मंधानाने ५८ धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हरलीन देओलने ५४ धावांची खेळी केली. टॉपच्या ३ फलंदाजांनी भारतीय संघाला दमदार सुरूवात करून दिली. कर्णधार हरमनप्रीत कौर अवघ्या ११ धावा करत माघारी परतली. शेवटी ऋचा घोषने २४, दीप्ती शर्माने नाबाद आणि राधा यादवने १९ धावांची खेळी केली. यासह भारतीय संघाने ५० षटकांअखेर ७ गडी बाद २८१ धावा केल्या.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २८२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार एलिसा हेलीने २७ धावांची सलामी दिली. तर तिची पार्टनर लिचफिल्डने ८८ धावांची दमदार खेळी केली. तिचं शतक अवघ्या १२ धावांनी हुकलं. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली एलिस पेरी ३० धावा करून रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतली. त्यानंतर बेथ मूनीने नाबाद ७७ आणि अॅनाबेल सदरलँडने नाबाद ५४ धावांची खेळी करून ऑस्ट्रेलियाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.
या विजयासह ऑस्ट्रेलियाने ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना येत्या १७ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवून पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.