Pat Cummins Statement On WTC Defeat: लॉर्ड्सच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना पार पडला. सामन्याच्या चौथ्या दिवशी या सामन्याचा निकाल लागला. २८२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने ५ गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने २८ वर्षांनंतर ऐतिहासिक विजयाची नोंद केली. तर दुसरीकडे १५ वर्षांनंतर आयसीसीच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघात मोठे बदल होणार असल्याचे संकेत संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने दिले आहेत.

ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल होणार

पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशश्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच आयसीसीच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ स्पर्धेला लवकरच सुरूवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ वेस्टइंडिजविरूद्धच्या मालिकेने करणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. आगामी मालिकेत टॉप ऑर्डरमध्ये मोठा बदल होऊ शकतो. उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेनला आपलं संघातील स्थान गमवावं लागू शकतं.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील पराभवानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पॅट कमिन्स म्हणाला, ” ही एक नवी सुरूवात आहे, असं मला वाटतं. आता बदल घडवण्याची योग्य वेळ आहे. वेस्टइंडिजविरूद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्याआधी आमच्याकडे काही आठवडे शिल्लक आहेत. आम्ही या पराभवानंतर नक्कीच विचार करू.”

तसेच तो पुढे म्हणाला, “सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक गमावून फलंदाजीला येणं हे टॉप ३ फलंदाजांसाठी मुळीच सोपं नसतं. पण, हा मला तरी वाटतं की फलंदाजी आक्रमणातील काही फलंदाज होते, जे चांगली कामगिरी करू शकले असते.”

निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला होता. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव अवघ्या २१२ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना सलामीला आलेले उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन हे दोघेही फ्लॉप ठरले. लाबुशेन १७ तर उस्मान ख्वाजा शून्यावर माघारी परतला. कॅमरून ग्रीन ४, ट्रॅव्हिस हेड ११ आणि अॅलेक्स कॅरी अवघ्या २३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फ्लॉप ठरले. मिचेल स्टार्कने अर्धशतकी खेळी केली. तर उस्मान ख्वाजा ६, मार्नस लाबुशेन २२, कॅमरून ग्रीन ०, स्टीव्ह स्मिथ १३ आणि ट्रॅव्हिस हेड अवघ्या ९ धावांवर माघारी परतला.