भारत-पाकिस्तान वर्ल्डकपमधील लढत काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. चर्चाना उधाण आलंय. वर्तमानपत्रांचे रकाने भरून वाहतायत. इतिहासाची उजळणी होतीय. जुने संदर्भ घेऊन भारताच्या स्थितीत काय होईल, याचे आडाखे बांधले जातायत. एकंदर वातावरण चांगलंच तापलंय.
वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सर्व लढती भारतानं जिंकल्या आहेत हे सगळय़ांना माहीत आहेच. या पाच लढतींमध्ये भारतातर्फे कुणाचंही शतक झालेलं नाही. भारताची फलंदाजी ही जमेची बाजू असताना हे काहीसं आश्चर्यकारक सत्य आहे. त्याला कारणं वेगवेगळी आहेत. त्याचा ऊहापोह नंतर कधीतरी. पण या पाच सामन्यांत बेताची धावसंख्या असताना आपण चार वेळा छान बचाव केला. (फक्त २००३ मध्ये आपण दुसरी फलंदाजी केली आणि जिंकलो.) या एकूण पाच विजयांपैकी दोन विजयांत व्यंकटेश प्रसादनं सिंहाचा वाटा उचलला होता. पण गोलंदाज असल्यानं बिचाऱ्याचा कोण उदो उदो करणार. दहा ते पंधरा पावलांचा स्टार्ट घेऊन अचूक दिशा आणि टप्प्यावर गोलंदाजी करणाऱ्या प्रसादचे भारतीय क्रिकेट रसिक कायम ऋणी राहतील. १९९६च्या भारतात झालेल्या विश्वचषक सामन्यात भारतानं २८७ धावा केल्या होत्या. मग पाकिस्ताननं तुफान सुरुवात करून बिनबाद ८४ पर्यंत मजल मारली होती. श्रीनाथनं अन्वरला काढल्यावर अमीर सोहेल, इजाज, इंझमाम यांचा अडसर प्रसादनं दूर केला होता. हे सर्व पाकिस्तानचे मधल्या फळीचे मजबूत स्तंभ होते. कणा मोडल्यावर पाकिस्तान संघ कोलमडला. जिंकल्यावर रात्री भारतात जो जल्लोष झाला, ज्या आनंदात पुढील काही दिवस भारतीयांनी काढले त्याचं काही टक्के पुण्य या कष्टाळू गोलंदाजाला जातं. १९९९च्या विश्वचषकातील मँचेस्टरचा सामना तर ‘प्रसादचा सामना’ म्हणून इतिहासानं नामकरण करावं असा होता. आपल्या २२७ धावा झाल्या होत्या. अगदी टिपिकल इंग्लंडच्या ढगाळ हवामानाचा पुरेपूर फायदा घेत प्रसादनं पाच विकेट काढून सामना जिंकून दिला. हे पाच फलंदाजसुद्धा मुख्य फळीतले. अन्वर, मलिक, इंझमाम, मोईन, अक्रम. महत्त्वाची गोष्ट अशी, की प्रसादच्या विकेट्स गुणवत्तापूर्ण गोलंदाजीनं मिळालेल्या होत्या. फलंदाज पुढे येऊन मारायला गेलाय आणि कुठेतरी लाँग ऑन, लाँग ऑफला झेल गेलाय असं नाही. तर चांगल्या दर्जाच्या आऊट स्विंग, इन स्विंगवर कॉट बिहाइंड, बोल्ड, एल.बी.डब्ल्यू. अशा बहुतेक विकेट्स घेतल्या त्यानं. क्वालिटी डिसमिसल्स. १९९९च्या सामन्याचा तो सामनावीर होता. विश्वनाथ, प्रसन्ना, चंद्रा, द्रविड, कुंबळे यांच्यासारखाच हा कर्नाटकचा अत्यंत सज्जन आणि मितभाषी खेळाडू. फलंदाजांच्या दुनियेत कमी दखल गेलेला दुर्लक्षित हीरो. पण आपल्या ऋणाच्या यादीत कायम वरच्या स्थानावर राहणारा. थँक्यू प्रसाद!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)