‘फिफा’ महाघोटय़ाळ्याचे सार्वत्रिक पडसाद आता तीव्र होऊ लागले आहेत. ब्राझील आणि अर्जेटिना यांच्यात अमेरिकेत आयोजित मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना रद्द करण्यात आला आहे. अर्जेटिनाच्या संघाच्या सामानाची ने-आण करणाऱ्या ‘फुल प्ले’ कंपनीचे अधिकारी अटकेत आहेत. अमेरिकेच्या विधी विभागानेच ही कारवाई केली आहे. विश्वचषक आयोजनाचे अधिकार आणि अन्य प्रकरणी अमेरिकेच्या पोलिसांच्या पुढाकारानेच स्वित्र्झलडमधील पोलिसांनी ‘फिफा’च्या पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. लाच, पैशांचा गैरव्यवहार, असे गंभीर गुन्हे या अधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये अर्जेटिनाच्या व्यावसायिकाचाही समावेश होता. या व्यावसायिकाची मालकी असणाऱ्या फुल प्ले कंपनीकडे मैत्रीपूर्ण लढतीच्या आयोजनाचे अधिकार होते. यजमानच वादाच्या भोवऱ्यात असल्याने ही लढत रद्द करण्यात आली आहे. ८ सप्टेंबरला ही लढत होणार होती.