पुढील वर्षी होणारी ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आणि रिओ डी जानेरो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक डबघाईत बुडालेल्या ब्राझील सरकारने दळणवळणाच्या भाडय़ामध्ये वाढ केल्याने ब्राझीलमधील जनतेच्या संतापाचा कडेलोट झाला होता. दळणवळणाच्या सुमार व्यवस्थेवर आधीच नाराज असलेल्या जनतेने ब्राझीलमधील अनेक शहरांत गेल्या काही दिवसांपासून सरकारविरोधात निदर्शने केली होती. अखेर बुधवारी ब्राझील सरकारला निदर्शकांपुढे नमते घ्यावे लागले.
ब्राझील सरकारने बस आणि उपनगरीय रेल्वेचे वाढवलेले दर मागे घेतले असून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या सुरू असलेल्या कॉन्फेडरेशन चषक स्पर्धेच्या सामन्यांवेळी नागरिकांनी विविध शहरांमध्ये वाहतूक कोंडी करीत निदर्शेने केली होती. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडून निदर्शकांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण निदर्शकांनी पोलीस अधिकाऱ्यांवर दगडफेक करत त्यांची वाहनेही जाळली. साव पावलोला जोडणारा अँचिएटा महामार्ग २०० निदर्शकांनी रोखून धरला होता. सान्तोस आणि साव बेर्नाडो येथेही त्यांनी निदर्शने केली. ब्राझील आणि मेक्सिको यांच्यात फोर्टालेझा येथील कॅस्टेलाओ स्टेडियमजवळ १५ हजार निदर्शकांची पोलिसांशी चकमक उडाली. त्यामुळे ‘फिफा’च्या अधिकाऱ्यांना स्टेडियमवर पोहोचण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले.