कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा
गॅब्रिएल जीससला लाल कार्ड दाखवण्यात आल्यामुळे १० खेळाडूंसह खेळूनसुद्धा ब्राझीलने सोमवारी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पेरू संघावर ३-१ अशी दणदणीत मात करून विजेतेपद मिळवले. ब्राझीलचे हे एकूण नववे विजेतेपद ठरले. २००७ नंतर प्रथमच त्यांनी जेतेपदावर नाव कोरले.
रिओ दी जानेरो येथील इस्टाडिओ डू मार्काना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ब्राझीलने सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर दिला. ईव्हर्टन सोरेसने १५व्या मिनिटाला पहिला गोल करून संघाचे खाते उघडले. जीससनेच केलेल्या पासचे गोलजाळ्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सोरेसने गोलमध्ये रूपांतर करून ब्राझीलला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
पहिल्या सत्रापर्यंत ब्राझील आघाडी टिकवण्यात यशस्वी होणार असे वाटत असतानाच पेरूच्या ख्रिस्टियन क्युवाने टोलवलेला चेंडू ब्राझीलच्या थिआगो सिल्व्हाच्या हाताला लागल्यामुळे पेरूला पेनल्टी बहाल करण्यात आली. पावलो ग्वेरेरोने याचा पुरेपूर लाभ घेत पेरूला ४४व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. परंतु भरपाई वेळेत ब्राझीलने लगेचच गोल नोंदवून पुन्हा आघाडी मिळवली. जिससने स्पर्धेतील व सामन्यातील संघासाठी दुसरा गोल झळकावून ब्राझीलला ४५+३ मिनिटाला २-१ असे वर्चस्व मिळवून दिले. मध्यांतरानंतर दोन्ही संघांमध्ये गोल करण्यासाठी कमालीची चुरस पाहावयास मिळाली. विशेषत: ब्राझीलच्या बचावपटूंनी भक्कम बचाव केल्यामुळे पेरूने गोल करण्याच्या अनेक संधी दवडल्या. मात्र ७०व्या मिनिटाला जिससला लाल कार्ड दाखवल्यामुळे अखेरची २० मिनिटे ब्राझीलवर १० खेळाडूंसह खेळण्याची नामुष्की ओढवली.
८९व्या मिनिटाला पेरूच्या झब्रॅनोने ब्राझीलच्या रिचर्डसनला पेनल्टी क्षेत्रात पाडल्यामुळे ब्राझीलला पेनल्टी मिळाली. रिचर्डसननेच या पेनल्टीचे गोलमध्ये रूपातंर करून ९०व्या मिनिटाला ब्राझीलसाठी तिसरा गोल झळकावून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
ब्राझीलचा डॅनी अल्वेस सवरेत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. ब्राझीलच्याच अॅलिसनला सवरेत्कृष्ट गोलरक्षकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात अर्जेटिनाने चिलीला २-१ असे पराभूत केले.
३ ईव्हर्टन सोरेस आणि पावलो ग्वेरेरो या दोघांनी स्पर्धेत सर्वाधिक तीन गोल झळकावले.
