फिरकी हे आपले यशाचे मुख्य अस्त्र आहे, अशा भ्रमात राहणाऱ्या भारतावर फिरकीचेच बूमरँग उलटले. फाजील आत्मविश्वासच त्यांना घातक ठरल्यामुळेच आमच्या संघास कसोटी मालिकेत २-१ असा विजय मिळविता आला, असे इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी मत व्यक्त केले आहे.
भारतीय हवामान व खेळपट्टय़ांवर आमच्याच खेळाडूंनी अधिक आत्मविश्वासाने खेळ केला. भारतीय संघ घरच्या मैदानावर यापूर्वी जसा असायचा तसा यंदा दिसून आला नाही. दोन संघांची तुलना केल्यास भारतापेक्षा आमचेच खेळाडू शारीरिक व मानसिकदृष्टय़ा जास्त तंदुरुस्त होते. भारताच्या फिरकी गोलंदाजांपेक्षा आमच्याच फिरकी गोलंदाजांनी अधिक प्रभावी गोलंदाजी केली. अॅलिस्टर कुकच्या नेतृत्वाखाली आमच्या संघाने खेळाच्या प्रत्येक आघाडीवर वर्चस्व गाजविले. एका दिवसात भारतीय गोलंदाज चारपेक्षा जास्त विकेट्स घेऊ शकले नाहीत यातच त्यांच्या गोलंदाजीतील कमकुवतपणा दिसून येतो. फिरकीच्या जोरावर इंग्लंडच्या फलंदाजांना गुंडाळून टाकणे आपल्याला सहज शक्य होईल हा भारताचा भ्रम निष्फळ ठरला, असे हुसेन यांनी येथील एका दैनिकात लिहिलेल्या स्तंभात म्हटले आहे.
हुसेन यांनी पुढे म्हटले आहे, अहमदाबाद येथील पहिल्या कसोटीत आमच्या संघाने लाजिरवाणा पराभव स्वीकारला, मात्र त्याचे कोणतेही दडपण न घेत आमच्या खेळाडूंनी उर्वरित तीनही कसोटींमध्ये आत्मविश्वासाने व धडाडीने खेळ केला. उर्वरित तीनही सामन्यांमध्ये दुसरा डाव आमच्यासाठी सामन्यास कलाटणी देणारा ठरला आणि याच डावांमध्ये आम्ही भारतापेक्षा सरस ठरलो. अहमदाबाद येथील कसोटीत कुक याने केलेले शतक आमच्यासाठी प्रोत्साहन देणारे ठरले. भारतीय गोलंदाजांबाबत घाबरण्यासारखे काहीच नाही. खेळपट्टीवर टिच्चून राहिले तर भारतीय गोलंदाजांवर प्रभुत्व गाजविता येईल हाच संदेश कुक याने पहिल्या कसोटीतील शतकाद्वारे दिला आणि हा संदेश स्वीकारीत आमच्या अन्य फलंदाजांनी उर्वरित कसोटींमध्ये जिद्दीने खेळ केला.
मॉन्टी पनेसर या फिरकी गोलंदाजाचे कौतुक करीत हुसेन यांनी केविन पीटरसन, टिम ब्रेस्नन यांच्या कामगिरीबद्दलही प्रशंसोद्गार व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2012 रोजी प्रकाशित
फिरकीचेच बूमरँग भारतावर उलटले -हुसेन
फिरकी हे आपले यशाचे मुख्य अस्त्र आहे, अशा भ्रमात राहणाऱ्या भारतावर फिरकीचेच बूमरँग उलटले. फाजील आत्मविश्वासच त्यांना घातक ठरल्यामुळेच आमच्या संघास कसोटी मालिकेत २-१ असा विजय मिळविता आला, असे इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी मत व्यक्त केले आहे.

First published on: 19-12-2012 at 08:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bumrang of spin on india husein