आजपासून भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. पण या मालिकेसाठी विंडीजचा सलामीवीर ख्रिस गेल याला मात्र संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे तो कॅनडाच्या टी २० लीगमध्ये आपला झंझावात दाखवत आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात गेलने तुफान फटकेबाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलच्या फटकेबाजीचा दणका एडमोंटन रॉयल्स संघाला बसला.

व्हॅनकुव्हर नाईट्स संघाने एडमोंटन रॉयल्सविरुद्ध खेळताना १६५ धावांचे आव्हान केवळ १६.३ षटकांत पूर्ण केले आणि त्यासाठी त्यांनी केवळ ४ गडी गमावले. यात ख्रिस गेलने मोलाचा वाटा उचलला. त्याने तुफानी खेळी केली. गेलने ४४ चेंडूंत २१४ च्या स्ट्राईक रेटने ६ चौकार आणि ९ षटकार खेचत ९४ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याचा संघ विजयासमीप आला. पण दुर्दैवाने गेलचे शतक मात्र हुकले.

शादाब खानला बसला ‘गेल स्टॉर्म’चा फटका

प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल्सची सुरुवातच खराब झाली. नवनीत धलीवाल (५), रिचर्ड बेरींग्टन (१) आणि कर्णधार मोहम्मद हाफिज (६) हे आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाले. बेन कटींग आणि मोहम्मद नवाझ यांनी संघाचा डाव सावरला आणि सामन्यात रंगत आणली. कटींगने ४१ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकार ठोकत ७२ धावांची खेळी केली. तर नवाझने २७ चेंडूंत ४० धावा केल्या. त्यामुळेच रॉयल्सला ९ बाद १६५ धावांपर्यंत मजल मारता आली.

या आव्हानाचा पाठलाग करताना नाईट्सचा सलामीवीर टोबियास व्हीसे केवळ एका धावेवर माघारी परतला. खराब सुरुवातीनंतर नाईट्सच्या संघाची अवस्था ८ षटकांत २ बाद ५८ अशी होती. पण त्यानंतर मात्र गेलच्या फलंदाजीने वेग पकडला. त्याने प्रत्येक गोलंदाजांचा समाचार घेत तुफान खेळी केली. त्याच्या झंझावाती खेळीच्या बळावर पुढील ८ षटकात व्हॅनकुव्हर नाईट्स संघाने शंभरहून अधिक धावा चोपल्या. गेलने ४४ चेंडूंत २१४ च्या स्ट्राईक रेटने ६ चौकार आणि ९ षटकार खेचत ९४ धावा केल्या. अनुभवी शोएब मलिकने ३४ धावा केल्या आणि संघाच्या विजयाला हातभार लावला.