सध्या कॅनडामध्ये सुरु असलेल्या टी २० लीग स्पर्धेची जोरदार चर्चा आहे. भारताचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग या स्पर्धेत आपल्या फटकेबाजीच्या जोरावर वाहवा मिळवत आहे. जगभरातील अनेक धमाकेदार खेळाडू या स्पर्धेत विविध संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या टी २० स्पर्धेत विंडीजचे अनेक खेळाडू खेळताना दिसत आहेत. त्यातीलच कायरन पोलार्ड आणि ड्वेन ब्राव्हो यांच्यात एका सामन्यात एक मजेदार प्रकार पाहायला मिळाला.

विनिपेग हॉक्स विरूद्ध टोरँटो नॅशनल्स या सोमवारी झालेल्या सामन्यात हे दोन मोठे खेळाडू आमनेसामने आले होते. सामन्यात ड्वेन ब्राव्होने धडाकेबाज खेळी करणाऱ्या कायरन पोलार्डला बाद केले. त्यानंतर ब्राव्होने त्याच्या खास पद्धतीमध्ये सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली. ब्राव्होने टाकलेला चेंडू दूरवर मारण्यासाठी पोलार्डने मोठा फटका मारला, पण तो चेंडू सीमारेषा पार करू शकला नाही. त्यामुळे पोलार्ड झेलबाद झाला. त्यानंतर ब्राव्होने ‘चॅम्पियन’ अंदाजात नेहमीप्रमाणे आनंद साजरा केला. पण याच दरम्यान पोलार्डने अत्यंत मजेशीर पद्धतीने त्याच्या सेलिब्रेशनमध्ये ‘बॅट’ टाकली.

हा व्हिडिओ सध्या सोशल मडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, विनिपेग हॉक्स संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना टोरँटो नॅशनल्स संघाने ७ बाद २१६ धावा केल्या होत्या. रॉड्रीगो थॉमस आणि युवराज सिंग यांनी संघाचा डाव सावरत चांगली खेळी केली. या जोडीने ७७ धावांची भागीदारी केली. युवीने २६ चेंडूत ४५ धावा चोपल्या. तर थॉमसने ४७ चेंडूत ६५ धावा ठोकल्या. कायरन पोलार्डनेदेखील दमदार खेळी करत २१ चेंडूत ५२ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना विनिपेग हॉक्स संघाकडून ख्रिस लीनने ४८ चेंडूत ८९ धावा केल्या, तर अन्वरने २१ चेंडूत ४३ धावा केल्या. सन्नी सोहलनेही २७ चेंडूत ५८ धावांची उपयुक्त खेळी केली. त्यामुळे विनिपेग हॉक्सने सामना ३ गडी राखून जिंकला.