फेअरप्ले स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि कॅपिटल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी पहिलीवहिली कॅपिटल कॉर्पोरेट लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या लीगमध्ये तब्बल १८४ संघ सहभागी होणार असून १६ आठवडय़ांत ३१६ सामने या स्पध्रेत रंगणार आहेत.
टाइम्स शिल्डच्या ‘अ’ गटातील एअर इंडिया, टाटा, इंडियन ऑइल, मुंबई पोलीस, डी.वाय. पाटील, भारत पेट्रोलियम, पश्चिम आणि मध्य रेल्वेसारखे अनेक दिग्गज संघ या स्पध्रेत खेळणार आहेत. याचबरोबर अन्य तीन गटांतही नावाजलेले संघ खेळणार असल्यामुळे स्पर्धेची रंगत वाढली आहे. तीन महिने रंगणाऱ्या स्पर्धेचे सामने दर शनिवारी खेळविले जातील. एकंदर आठ गटांत होणाऱ्या या स्पर्धेचे अंतिम सामने २९, ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी या दिवशी वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहेत. ‘अ’ आणि ‘ब’ गटातील विजेत्या संघाला २.५ लाख रुपये, तर उपविजेत्यांना २ लाख रुपयांचे इनाम दिले जाईल. ‘क’ आणि ‘ड’ गटातील विजेत्याला आणि उपविजेत्याला अनुक्रमे २ लाख आणि दीड लाख इनाम दिले जाईल.
‘‘कॉर्पोरेट लीगद्वारे मुंबईतील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळेल. आज खेळाडूंच्या नोकऱ्यांचा प्रश्न बिकट होत चालला आहे. या लीगमध्ये सहभागी होणारे संघ नव्या खेळाडूंना संधी देतील,’’ असा विश्वास मुंबई क्रिकेट असोसिसएशनचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी व्यक्त केला.