न्यूयॉर्क : स्पेनच्या १९ वर्षीय कार्लोस अल्कराझकडे टेनिसचे भविष्य म्हणून का पाहिले जात आहे, याचा रविवारी मध्यरात्री झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रत्यय आला. अल्काराझने नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा ६-४, २-६, ७-६
(७-१), ६-३ असा पराभव करून अमेरिकन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. हे त्याच्या युवा कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. यासह त्याने जागतिक टेनिस क्रमवारीतही अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
तमाम टेनिस शौकिनांचे लक्ष लागून असलेल्या या अंतिम लढतीत अल्काराझने जबरदस्त ताकद आणि नेटवर प्रभावशाली खेळाचे प्रदर्शन केले. तिसऱ्या मानांकित अल्काराझने कमालीचा आक्रमक खेळ करताना दडपणाचाही चांगला सामना केला.
अंतिम सामन्यात दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एक सेट जिंकल्यानंतर तिसरा सेट कमालीचा रंगला. टायब्रेकरमध्ये अल्कारेझने ताकदवान खेळाच्या जोरावर सेट आपल्या नावावर केला. त्यानंतर चौथ्या सेटमध्ये रुडची सव्र्हिस भेदण्याची संधी साधून अल्कारेझने ४-२ अशी आघाडी घेतली. अखेरच्या गेममध्ये दोन बिनतोड सव्र्हिस करून अल्काराझने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
अल्काराझ हा देशवासीय राफेल नदालनंतर १९व्या वर्षी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याचबरोबर पीट सॅम्प्रसनंतर (१९९०) १९व्या वर्षी अमेरिकन स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा टेनिसपटू ठरला आहे.
२३ तास ३९ मिनिटे कोर्टवर
अल्काराझने अमेरिकन खुल्या स्पर्धेत एकूण सात सामने खेळले. यापैकी त्याचे तीन सामने (उपउपांत्यपूर्व, उपांत्यपूर्व आणि उपांत्य) पाच सेटपर्यंत चालले होते. अंतिम फेरीत त्याने चार सेटमध्ये विजय मिळवला. त्यामुळे या स्पर्धेदरम्यान तो तब्बल २३ तास ३९ मिनिटे टेनिस कोर्टवर राहिला.