प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण करतानाच सिद्धेश लाड याने झंझावती नाबाद शतक ठोकले, त्यामुळेच मुंबईस विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी सौराष्ट्रावर १२६ धावांनी विजय मिळविता आला. मुंबईचा हा दुसरा विजय आहे.
सिद्धेशने सात चौकार व सहा षटकारांची टोलेबाजी करीत पूना क्लबचे मैदान दणाणून सोडले. त्याने केवळ ९१ चेंडूंमध्ये नाबाद ११५ धावा केल्या व शोएब शेख याच्या साथीत चौथ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. शेख यानेही आक्रमक खेळ करीत ९४ चेंडूंमध्ये ७२ धावा केल्या. त्यामध्ये त्याने सात चौकार व दोन षटकार अशी फटकेबाजी केली. सिद्धेशने अंकित चव्हाण (नाबाद १८) याच्या साथीत आठव्या विकेटसाठी ७६ धावांची अखंडित भागीदारी केली.
फलंदाजांकडून स्फूर्ती घेत मुंबईच्या अजित आगरकर (४/१९) व क्षेमल वायंगणकर (५/४२) या द्रुतगती गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यापुढे सौराष्ट्राचा डाव ४१.५ षटकांमध्ये केवळ १५७ धावांमध्ये कोसळला. सौराष्ट्राकडून चिराग जानी याने झुंजार खेळ करीत ६१ धावा केल्या. त्यामध्ये त्याने तीन चौकार व चार षटकार अशी फटकेबाजीही केली. त्याचे सहकारी जयदेव शहा (२४) व प्रतीक मेहता (३२) यांचे प्रयत्नही अपुरे ठरले.
संक्षिप्त निकाल  
मुंबई : ५० षटकांत ७ बाद २८३ (शोएब शेख ७२, सिद्धेश लाड नाबाद ११५, अंकित चव्हाण नाबाद १८, कुलदीप रावळ २/२३, जयदेव उनाडकत २/५४) वि. वि. सौराष्ट्र : ४१.५ षटकांत १५७ (जयदेव शहा २४, चिराग जानी ६१, प्रतीक मेहता ३२, क्षेमल वायंगणकर ५/४२, अजित आगरकर ४/१९).