चॅम्पियन्स लीगचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून चेल्सीचा अनुभव विरुद्ध अॅटलेटिको माद्रिदचे कामगिरीतील सातत्य असा उपांत्य फेरीचा परतीचा सामना बुधवारी रात्री स्टॅम्फर्ड ब्रिज, लंडनमध्ये रंगणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही संघांना गोलशून्य बरोबरीत समाधान मानावे लागले होते. पण दुसऱ्या टप्प्यातील सामना बरोबरीत राहिल्यास, आतापर्यंत अपराजित राहिलेला अॅटलेटिको माद्रिद संघ अंतिम फेरीत मजल मारेल. तर विजय मिळवून थेट अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी चेल्सी उत्सुक आहे.
अॅटलेटिको माद्रिदने ४० वर्षांनंतर पहिल्यांदात उपांत्य फेरीत झेप घेतली आहे. मात्र या मोसमात सुरेख कामगिरी करणारा अॅटलेटिको संघ स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याच्या उंबरठय़ावर आहे. तर दुसरीकडे महत्त्वाच्या टप्प्यातील सामने कसे जिंकायचे, यात चेल्सीचे प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांचा हातखंडा आहे. २०११-१२ मोसमात चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावणाऱ्या चेल्सीला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळणार आहे.
या वर्षी चॅम्पियन्स लीगमध्ये भक्कम बचावासह अॅटलेटिको माद्रिदने अपराजित राहण्याची किमया केली आहे. १० सामन्यांत त्यांनी फक्त पाच गोल स्वीकारले आहेत.
तीन वेगवेगळ्या क्लब्सना युरोपियन चषक जिंकून देणारे पहिले प्रशिक्षक बनण्याचा मान मिळवण्यासाठी चेल्सीचे जोस मॉरिन्हो उत्सुक आहेत.
कर्णधार जॉन टेरी आणि गोलरक्षक पीटर सेक चेल्सी संघात पुनरागमन करण्याची शक्यता.
मॉरिन्हो यांनी अॅटलेटिकोविरुद्धच्या ९ सामन्यांत फक्त एक पराभव पत्करला आहे.
अॅटलेटिकोचा कर्णधार गाबीच्या समावेशाविषयी शंका.
संभाव्य संघ :
अॅटलेटिको माद्रिद : थिबाऊट कोटरेईस (गोलरक्षक), गाबी (कर्णधार), दिएगो गॉडिन, फिलिपे लुइस, मारिओ सुआरेझ, कोके, राऊल गार्सिया, दिएगो कोस्टा, जुआनफ्रान, मिरांडा, दिएगो, डॅनियल अरानझुबिया, थिआगो, डेव्हिड व्हिला, अर्दा तुरान, ख्रिस्तियान रॉड्रिगेझ, टोबी अल्देरवेईरेल्ड, जोस सोसा, प्रशिक्षक : दिएगो सिमोन.
चेल्सी : पीटर सेक (गोलरक्षक), जॉन टेरी (कर्णधार), अॅशले कोल, डेव्हिड लुइझ, रामिरेस, फ्रँक लॅम्पार्ड, फर्नाडो टोरेस, जॉन ओबी मिकेल, विलियन, गॅरी काहिल, सेसार अझ्पिलिक्युएटा, मार्क श्वार्झर, ऑस्कर, आंद्रे स्करल, मार्को व्हॅन जिंकेल, डेम्बा बा, नॅथन अके, टोमास कालास, प्रशिक्षक : जोस मॉरिन्हो.
ठिकाण : स्टॅम्फर्ड ब्रिज, लंडन
चॅम्पियन्स लीगचे जेतेपद :
अॅटलेटिको माद्रिद : ०
चेल्सी : १ (२०११-१२)
आमने-सामने
सामने अॅटलेटिको चेल्सी बरोबरी
४ १ १ २
गोल ६ ७