बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : भारताच्या ‘ब’ संघाने उझबेकिस्तानला रोखले

महिला विभागातील भारताच्या ‘अ’ संघाने कझाकस्तानवर ३.५-०.५ अशी मात केली.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : भारताच्या ‘ब’ संघाने उझबेकिस्तानला रोखले
आर. प्रज्ञानंद

चेन्नई : खुल्या विभागातील भारतीय ‘ब’ संघाने सोमवारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या १०व्या फेरीत उझबेकिस्तानला बरोबरीत रोखले. या लढतीपूर्वी उझबेकिस्तान आणि भारतीय ‘ब’ संघ गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर होते. या निकालामुळे उझबेकिस्तानने अग्रस्थान राखले असून त्यांचे आणि अर्मेनियाचे समान गुण आहेत.

भारत ‘ब’ आणि उझबेकिस्तान यांच्यातील लढतीत आर. प्रज्ञानंदने विजयाची नोंद केली, तर डी. गुकेशला स्पर्धेतील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. निहाल सरिन आणि बी. अधिबन यांचे सामने बरोबरीत सुटले. याच विभागातील भारताच्या ‘अ’ संघाला इराणने १.५-२.५ अशा फरकाने पराभूत केले. त्यामुळे त्यांच्या जेतेपदाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. भारत ‘अ’ संघाकडून पहिल्या पटावरील पी. हरिकृष्णाने आपला सामना जिंकला. परंतु विदित गुजराथी आणि एसएल नारायणन पराभूत झाले, तर अर्जुन इरिगेसीचा सामना बरोबरीत सुटला. भारताच्या ‘क’ संघाने स्लोव्हाकियाला बरोबरीत रोखले.

महिला विभागातील भारताच्या ‘अ’ संघाने कझाकस्तानवर ३.५-०.५ अशी मात केली. त्यांच्याकडून कोनेरू हम्पी, तानिया सचदेव आणि भक्ती कुलकर्णी यांनी आपापले सामने जिंकले. दुसऱ्या पटावरील आर. वैशाली आणि असायूबायेव्हा यांच्यातील लढत ५० चालींअंती बरोबरीत सुटली. भारताच्या ‘ब’ संघाने नेदरलँड्सचा ३-१ असा पराभव केला. पद्मिनी राऊत, मेरी अ‍ॅन गोम्स, दिव्या देशमुख यांनी विजय मिळवले. तसेच भारताच्या ‘क’ संघाने स्वीडनला ३-१ असे नमवले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Asia Cup 2022: आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; विराट कोहली अन् केएल राहुलचे पुनरागमन तर दुखापतग्रस्त बुमराह बाहेर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी