ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज शॉन टेट याचा जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांमध्ये समावेश होतो. सतत १५० किमीच्या वेगाने गोलंदाजी करण्याची शॉन टेटची क्षमता आहे. ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान अस्त्रासमोर आजवर अनेक फलंदाजांची विकेट पडली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या सुप्रसिद्ध ‘बीग बॅश ट्वेन्टी-२० लीग’मध्ये एका युवा ऑस्ट्रेलियन फलंदाजाने शॉन टेटच्या गोलंदाजीवर विक्रम षटकार ठोकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात उत्तुंग षटकारांमध्ये या षटकाराची नोंद करण्यात आली आहे.
ब्रिस्बेनच्या अवाढव्य स्टेडियमवर झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात शॉन टेटच्या १४८ किमी वेगाच्या चेंडूवर ख्रिस लिन या युवा फलंदाजाने तब्बल १२१ मीटर लांब षटकार ठोकला. ख्रिसने लगावलेला षटकार इतका दमदार होता की चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर पोहोचला. सामना सुरू ठेवण्यासाठी नवीन चेंडू मागवावा लागला. ख्रिसने लगावलेला षटकार पाहून शॉन टेट मिश्किल हास्य देण्याशिवाय दुसरे काहीच करू शकला नाही. ख्रिस लेनने या सामन्यात ५० चेंडूत नाबाद ८४ धावांची खेळी साकारली. यात ख्रिसने चार चौकार आणि सात खणखणीत षटकार ठोकले. ख्रिसने न्यूझीलंडच्या माजी कर्णधार ब्रॅण्डन मॅक्क्युलमसोबत दुसऱया विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी रचली. मॅक्क्युलमने ७२ धावांची खेळी साकारली.
You can't be serious! This is a video game!
That is absolute #LYNNSANITY pic.twitter.com/SeXqxlCDaH
— KFC Big Bash League (@BBL) December 30, 2016