साखळी सामन्यांमधील या दोन्ही संघांची स्थिती पाहून विरोधाभास होतो खरा, पण आता बाद फेरीमध्ये एकाच सामन्यात राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. ‘ग्रुप ऑफ डेथ’ समजल्या जाणाऱ्या ‘ड’ गटात अव्वल स्थान पटकावत कोस्टा रिकाचा संघ बाद फेरीत दाखल झाला आहे, तर दुसरीकडे ग्रीसचा संघ काठावर पास होऊन बाद फेरीत दाखल झाला आहे. पण बाद फेरीत कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नसते, त्यामुळे कोस्टा रिकाला गाफील न राहता सावधान राहण्याची गरज आहे.
साखळीमध्ये कोस्टा रिकाची अग्निपरीक्षा होती आणि त्यामध्ये त्यांनी दमदार खेळ करत अव्वल स्थान पटकावले होते. उरुग्वेसारख्या संघाला त्यांनी ३-१ असे पराभूत केले होते, इटलीवर त्यांनी १-० असा विजय मिळवला होता, तर इंग्लंडबरोबर त्यांचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला होता. साखळी सामन्यामध्ये कडवे आव्हान यशस्वीरीत्या पेलल्यामुळे त्यांच्यापुढे ग्रीसचे आव्हान माफक असेल, पण तरीही त्यांना गाफील राहून चालणार नाही.
ग्रीसच्या संघाला आतापर्यंत लक्षणीय कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात त्यांना कोलंबियाकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर जपानबरोबर त्यांनी गोलशून्य बरोबरी साधली होती आणि महत्त्वाच्या ‘करो या मरो’ सामन्यात त्यांनी आयव्हरी कोस्टवर २-१ असा विजय मिळवीत बाद फेरीत प्रवेश केला होता.
दोन्ही संघांचा विचार करता ग्रीसपेक्षा कोस्टा रिकाचेच पारडे जड आहे. कोस्टा रिकाचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तर दुसरीकडे ग्रीसच्या संघाला आक्रमण आणि बचाव या दोन्ही गटांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही, जर त्यांनी खेळात सुधारणा केली, तर नक्कीच ते कोस्टा रिकाला धक्का देऊ शकतील.
गोलपोस्ट
साखळी फेरीत संघाची लक्षणीय कामगिरी पाहायल मिळाली. या कामगिरीने संघाचे मनोबल वाढलेले आहे, त्याचबरोबर आत्मविश्वासही दुणावला आहे. ग्रीसबरोबर दोन हात करायला आम्ही सज्ज झालो आहोत. आतापर्यंत ग्रीसने बचावात्मक खेळावर भर दिला आहे. त्यामुळे त्यांचा बचाव भेदत जोरदार आक्रमण करण्याचा आमचा मानस आहे. पण फक्त आक्रमणावर भर न देता बचावही अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
– जॉर्ज लुईस पिंटो, कोस्टा रिका

‘ग्रुप ऑफ डेथ’ गटामधून कोस्टा रिकाचा संघ अव्वल स्थान पटकावत बाद फेरीत पोहोचला आहे. आतापर्यंत त्याच्याकडून दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे या सामन्याकडे आम्ही गंभीरपणे पाहत आहोत. बाद फेरीमध्ये कोणताही संघ पराभूत होऊ शकतो आणि त्याने आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे उपान्त्यपूर्व फेरी गाठण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
फर्नाडो सँटोस, ग्रीस

सामना क्र. ५२: कोस्टा रिका वि. ग्रीस
स्थळ : एरेना पेर्नाबुको, रेसिफे  ल्ल वेळ : मध्यरात्री १.३० वा.पासून
लक्षवेधी खेळाडू
ऑस्कर डुआर्टे (कोस्टा रिका) : उरुग्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पहिलाच गोल करीत संघाच्या विजयाचा पाया रचला तो ऑस्कर डुआर्टेने. ऑॅस्कर हा खरा बचावपटू असला तरी संघाला जेव्हा आक्रमणाची गरज लागते तेव्हा प्रतिस्पध्र्यावर चाल करीत त्याने संघाला अपेक्षित कामगिरी करून दिली आहे. त्यामुळे ग्रीसविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याच्याकडून संघाला मोठी अपेक्षा असेल.

आंर्देस समारिस (ग्रीस) : ग्रीसच्या संघाने साखळी फेरीत एकमेव विजय मिळवला आणि या विजयात मोलाचा वाटा उचलला तो आंर्देस समारिसने. ग्रीससाठी मधल्या फळीत खेळताना आंर्देसने आक्रमण आणि बचाव या दोन्ही बाजू समर्थपणे सांभाळल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये तो संघासाठी धावून येऊ शकतो. त्यामुळेच ग्रीससाठी तो हुकमी एक्का ठरला आहे.

आमने-सामने
दोन्ही संघांमध्ये विश्वचषकात एकही सामना झालेला नाही.