भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) क्रीडा विकास अधिकारी रत्नाकर शेट्टी यांच्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) घातलेल्या पाच वर्षांच्या बंदीच्या निर्णयाला न्यायालयाने शनिवारी स्थगिती देत शेट्टी यांना दिलासा दिला.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या भारत-पाकिस्तान ‘ट्वेन्टी-२०’ सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार करण्यात काही असोसिएशनचे अधिकारी गुंतले असल्याच्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर असोसिएशनने शेट्टी यांच्यावर पाच वर्षांची बंदी घातली होती. गेल्या ३ जून रोजी शेट्टी यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शेट्टी यांना असोसिएशनच्या निवडणुकांसह कुठल्याही प्रक्रियेत सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यानंतर शेट्टी यांनी असोसिएशनचा हा निर्णय बेकायदा असल्याचा दावा करीत त्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने शेट्टी यांचे म्हणणे मान्य करीत असोसिएशनच्या बंदीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देऊन शेट्टी यांना दिलासा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court stays mcas ban on cricket administrator ratnakar shetty