स्नूकर आणि बिलियर्ड्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने नवनवी शिखरे पादाक्रांत करणाऱ्या भारताच्या अडवाणीने अॅडलेड येथे सुरू असलेल्या जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले. पंकजचे कारकीर्दीतील हे १४ वे विश्वविजेतेपद आहे. ३० वर्षीय पंकजने अफलातून खेळासह सिंगापूरच्या पीटर गिलख्रिस्टवर ११६८ गुणांनी विजय मिळवला.
‘गुण स्वरूपातील अंतिम लढतीत पीटरविरुद्ध मला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे हे जेतेपद पटकावण्याचा मी निश्चय केला होता. अंतिम लढतीपूर्वी क्रीडा मानसशास्त्रज्ञ असलेल्या भावाशी डावपेचांविषयी सविस्तर बोलणे झाले आणि त्यानुसार खेळ होऊ शकल्यानेच जेतेपद प्रत्यक्षात साकारले. पुरेशी झोप झालेली असल्याने ताजातवाना होतो’, असे पंकजने सांगितले.
सातत्याने विश्वविजेतेपदे नावावर केल्यामुळे गोल्डन बॉय, अशी बिरुदावली पटकावलेल्या पंकजने वेळ प्रकारातले विश्वविजेतेपद कायम राखले आणि गुण प्रकारात आठवडाभरापूर्वी झालेल्या पराभवाची परतफेडही केली.
पंकजने १२७ गुणांची झटपट आघाडी घेतली. यंदाच्या वर्षी ६ रेड स्नूकर जागतिक विजेता असलेल्या पंकजने ३६० आणि ३०१ गुणांची कमाई केली.
भारतीय स्नूकर आणि बिलियर्ड्स विश्वाचा चेहरा असलेल्या या गुणी खेळाडूने ७०० गुणांच्या आघाडीसह विजयाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले. २८४, ११९, १०१ आणि १०६ च्या ब्रेकसह पंकजने आपली आघाडी हजारापुढे नेली. दुसऱ्या सत्रात दोन शतकी ब्रेकसह पंकजने आगेकूच केली. मात्र, पीटरने २८४ आणि दोन शतकी ब्रेकसह पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, झंझावाची फॉर्ममध्ये असलेल्या पंकजने ४३० च्या ब्रेकसह जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. जेतेपदासह पंकजने बिलियर्ड्स विश्वात जेतेपदांवरची मक्तेदारी सिद्ध केली.
‘गेले काही वर्ष स्नूकर आणि बिलियर्ड्स, अशा दोन्ही प्रकारांमध्ये सातत्याने सहभागी होत आहे. ६ रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदाने सुरुवात झाली आणि बिलियर्ड्समधील जेतेपदाने हंगामाचा शेवट होत आहे’, याचे समाधान आहे, असे पंकजने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Sep 2015 रोजी प्रकाशित
पंकज अडवाणी विश्वविजेता १४ व्या जेतेपदाला गवसणी
जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले. पंकजचे कारकीर्दीतील हे १४ वे विश्वविजेतेपद आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 28-09-2015 at 06:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cueist pankaj advani pockets 14th world billiards title