बुद्धिबळा जगतातून एक दुःखद बातमी आली आहे. प्रसिद्ध अमेरिकन ग्रँडमास्टर डॅनियल नारोडित्स्की याचे वयाच्या २९ व्या वर्षी अचानक निधन झाले. त्यांच्या जाण्याने जगभरातील बुद्धिबळ चाहते आणि खेळाडूंमध्ये शोककळा पसरली आहे. डॅनियल केवळ एक हुशार खेळाडू नव्हता तर तो एक उत्तम शिक्षक आणि समालोचक देखील होता.

डॅनियलने वयाच्या १८ व्या वर्षी ग्रँडमास्टरचा किताब मिळवला आणि तेव्हापासून तो बुद्धिबळ जगतातील एक एक प्रसिद्ध नाव बनला. २००७ मध्ये १२ वर्षांखालील जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धा जिंकत त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली. २०२१ मध्ये, त्याने यूएस नॅशनल बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या फॅबियानो कारुआनाला पराभूत करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. फक्त दोन महिन्यांपूर्वी, ऑगस्ट २०२५ मध्ये, त्याने यूएस नॅशनल ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये त्याच्या १४ पैकी सर्व १४ सामने जिंकले होते.

त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेलं नाही, परंतु त्यांच्या निधनाच्या बातमीने बुद्धिबळ जगतात शोककळा पसरली आहे. माजी विश्वविजेते आणि रशियन ग्रँडमास्टर व्लादिमीर क्रॅमनिक यांनी अमेरिकन ग्रँडमास्टर डॅनियल नारोदित्स्कीच्या वयाच्या २९ व्या वर्षी झालेल्या आकस्मिक निधनावर शंका व्यक्त केली आहे.

ही दुःखद बातमी समोर आल्यानंतर लगेचच, क्रॅमनिकने नारोदित्स्कीच्या अचानक मृत्यूच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्फोटक ट्विट्सची मालिका पोस्ट केली. क्रॅमनिकने यापूर्वी नारोदित्स्कीवर ऑनलाइन बुद्धिबळात फसवणूक केल्याचा आरोप केला होता.

क्रॅमनिक यांनी डॅनियल नारोदित्स्कीच्या मृत्यूला एक भयानक शोकांतिका म्हटलं आणि चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यामध्ये नारोदित्स्कीच्या अचानक मृत्यूबद्दल चिंता व्यक्त केली. नारोदित्स्कीचे वयाच्या २९ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या मृत्यूची घोषणा सोमवारी शार्लोट चेस सेंटरच्या एक्स अकाउंटने केली, ज्यात लिहिले होते, “डॅनियलच्या अचानक निधनाची दुःखद बातमी नारोदित्स्की कुटुंबाने दिली आहे. डॅनियल एक प्रतिभावान बुद्धिबळपटू, शिक्षक आणि बुद्धिबळ समुदायाचा प्रिय सदस्य होता. या दुःखाच्या काळात कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची आम्ही विनंती करतो.”

भारताचे पाच वेळा विश्वविजेते खेळाडू विश्वनाथन आनंद यांच्यासह प्रज्ञानंदने देखील डॅनियलच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे.