टेनिसमधील दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविचला गुरुवारी दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या ATP 500 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याला बिगरमानांकित जिरी वेस्लीने ६-४, ७-६ने पराभूत केले. जोकोविचच्या पराभवाचा अर्थ असा आहे, की रशियाचा डॅनिल मेदवेदेव आता जोकोविचच्या जागी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा पुरुष खेळाडू बनेल. २८ फेब्रुवारीला नवीन क्रमवारी जाहीर होणार आहे. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे आणि यादरम्यान मेदवेदेवला ही आनंदाची वार्ता मिळाली आहे. ”या तणावाच्या परिस्थितीत नंबर वन खेळाडू म्हणून मला शांततेचे आव्हान करायचे आहे”, असे मेदवेदेव म्हणाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अग्रस्थान मिळवणारा मेदवेदेव हा तिसरा रशियन खेळाडू असेल. यापूर्वी येवगेनी काफिलनिकोव्ह (१९९९) आणि मरात साफिन (२०००-०१) यांनी ही कामगिरी केली होती. बिग फोर (नदाल, फेडरर, जोकोविच आणि अँडी मरे) व्यतिरिक्त पहिल्या क्रमांकावर असलेला शेवटचा खेळाडू अँडी रॉडिक होता.

रॉडिक ३ नोव्हेंबर २००३ रोजी पहिल्या स्थानावर पोहोचला आणि २ फेब्रुवारी २००४ रोजी त्याला अव्वल क्रमवारीतून वगळण्यात आले. त्यानंतर रॉजर फेडरर नंबर वन बनला. यानंतर, गेल्या १८ वर्षात केवळ फेडरर, नदाल, जोकोविच आणि अँडी मरे यांनीच अग्रस्थान पटकावले आहे. गेल्या ११ महिन्यांपासून जोकोविच पहिल्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – IPL 2022 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज वेगळ्या गटात; वाचा संघ आणि त्यांचे गट!

सर्वाधिक ३६१ आठवडे नंबर वन राहण्याचा विक्रम जोकोविचच्या नावावर आहे. यानंतर रॉजर फेडरर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो ३१० आठवडे पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, जोकोविच पुन्हा नंबर वन बनू शकतो. जोकोविच सलग ८६ आठवडे पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय जोकोविचने विक्रमी सातवेळा नंबर वन राहून वर्ष पूर्ण केले आहे. जोकोविचने २० ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. त्याने नऊ ऑस्ट्रेलियन ओपन, सहा विम्बल्डन, तीन यूएस ओपन आणि दोन फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daniil medvedev is the new world no 1 in atp rankings adn