करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात सध्या भीतीचं वातावरण आहे. भारतातही प्रत्येक दिवशी करोना बाधित रुग्ण आढळत आहेत. युरोप आणि चीनमध्ये करोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. करोनापासून वाचण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जगभरात महत्वाच्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने आयपीएल आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन-डे मालिका रद्द केली आहे. (आयपीएलचं आयोजन हे १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलं आहे.) पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही आपल्या पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेचे उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने स्थगित केलेत. अशातच पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेत खेळणारा इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्सला करोनाची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली होती. हेल्स कराची किंग संघाकडून खेळतो.
माजी पाक क्रिकेटपटू रमीझ राजा आणि काही पत्रकारांनी या वृत्ताला दुजोराही दिला होता. मात्र पाक क्रिकेट बोर्डाकडून कोणतंही अधिकृत वृत्त आलेलं नव्हतं. त्यामुळे अॅलेक्स हेल्सने या सर्व अफवांवर स्षष्टीकरण दिलं आहे. “पाकिस्तान सोडून इंग्लंडमध्ये परतेपर्यंत मला करोनाची लागण झालेली नव्हती. मात्र रविवारी सकाळी उठल्यानंतर मला ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवायला लागला. यानंतर मी सर्व खबरदारीचे उपाय पाळतो आहे. मात्र अद्याप माझी करोनाची वैद्यकीय चाचणी झालेली नाही. ज्यावेळी ही चाचणी होईल, त्यावेळी मी याबद्दल माहिती देईन”, हेल्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्पष्टीकरण जारी केलं आहे.
An update on my situation, stay safe everyone pic.twitter.com/8mDPOBGmI8
— Alex Hales (@AlexHales1) March 17, 2020
दरम्यान स्पेनमधील आल्टा क्लबच्या २१ वर्षीय फुटबॉल प्रशिक्षकाला करोना विषाणूमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. भारतामध्येही दर दिवशी करोनाचे रुग्ण सापडत आहेत. केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी व्हिसाचे नियम कडक केले आहेत. केंद्र व राज्य सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.
