आयपीएलच्या ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणातील संशयाच्या वावटळीत आपण सापडू नये, यासाठी भारताचा कर्णधार पदत्याग करण्यासाठी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एन. श्रीनिवासन यांना भारतीय क्रिकेट मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्षपद गमवावे लागले असून, आता आपल्यावरही संकटाची कुऱ्हाड पडू नये, यासाठी धोनीने आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद आणि इंडिया सिमेंट या कंपनीचे उपाध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारतीय संघ सध्या बांगलादेशमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळत असला, तरी आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणात नाव आल्याने तो निराश झाला आहे. त्यामुळेच आपल्यावर कोणतेही संकट येऊ नये, यासाठी साधव पवित्रा घेण्याचे त्याने ठरवले आहे. इंडिया सिमेंटचे मालक एन. श्रीनिवासन यांच्याशी शुक्रवारी धोनीने दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेमध्ये त्याने इंडिया सिमेंट या कंपनीच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारावा आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या कर्णधारपदावरून मुक्त करावे, असे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही गोष्टी एन. श्रीनिवासन यांनी अजूनही मान्य केल्या नसून, यावर सखोल चर्चा करण्याचा मानस एन. श्रीनिवासन यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी हे दोघेही काही दिवसांमध्ये भेटणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात धोनी खोटे बोलल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे आपली प्रतिमा वाईट होत असल्याचे धोनीला वाटत असून, त्यामुळेच त्याने एन. श्रीनिवासन यांच्याशी चर्चा करून पदत्याग करण्याचा मानस व्यक्त केला आहे , अशी माहिती धोनीच्या निकटच्या व्यक्तीने दिली आहे.