मैदानावरील अनुभव हाच माझा गुरू ठरला असून, त्याच्या जोरावरच मी आजपर्यंत कर्णधार म्हणून अव्वल दर्जाचे यश मिळवू शकलो आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सांगितले.
धोनीने नुकताच येथे ३३वा वाढदिवस साजरा केला. गेल्या सात वर्षांत कर्णधारपद भूषवताना त्याला आलेल्या अनुभवाविषयी धोनी म्हणाला, २००७ मध्ये पहिल्यांदा माझ्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली गेली. क्रिकेटवेडय़ा भारतीय देशाच्या संघाचे नेतृत्व करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. त्यातही माझ्यापेक्षा कितीतरी अनुभवी व श्रेष्ठ खेळाडू संघात असताना ही जबाबदारी माझ्यासाठी आव्हान होते. मात्र मैदानावर उतरल्यानंतर माझ्यावरील या आव्हानाचे दडपण दूर होत गेले व हळूहळू त्याची सवय होत गेली. मी खूप काही दीर्घ नियोजन करीत नाही. माझ्या अंगात असलेली धाडसीवृत्तीच मला आजपर्यंत उपयोगास आली आहे.
जसजसे मी सामने खेळत गेलो आहे, तसतसा अनुभव माझ्यासाठी कारकीर्दीची शिकवणीच ठरला आहे. प्रत्येक सामन्यात वेगवेगळय़ा परिस्थितीशी सामोरे जावे लागले असल्यामुळे मला त्यामधून भरपूर शिकावयास मिळाले आहे असेही धोनी म्हणाला.
भारताचा इंग्लंडबरोबर येथे ९ जुलैपासून पहिली कसोटी सामना होणार आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस.लक्ष्मण या बुजुर्ग खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ येथे सामना खेळणार आहे. त्याविषयी धोनी म्हणाला, या खेळाडूंकडून मला भरपूर मार्गदर्शन मिळाले आहे. ते आता खेळू शकणार नसले तरी संघात अनेक युवा व तडफदार खेळाडू असल्यामुळे आमचा संघ येथे चांगली कामगिरी करील अशी मला खात्री आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jul 2014 रोजी प्रकाशित
मैदानावरील अनुभव प्रेरणादायक -धोनी
मैदानावरील अनुभव हाच माझा गुरू ठरला असून, त्याच्या जोरावरच मी आजपर्यंत कर्णधार म्हणून अव्वल दर्जाचे यश मिळवू शकलो आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सांगितले.

First published on: 08-07-2014 at 12:49 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhoni qualities that make him the most successful indian cricket captain