ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिओ दी जानेरो येथे सुरू असलेल्या  ऑलिम्पिक चाचणी आणि अंतिम पात्रता स्पध्रेत भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने अप्रतिम कामगिरी करत रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. हा पराक्रम करणारी दीपा ही पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली आहे. रिओ दी जानेरो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत महिला आर्टिस्टिक प्रकारात तिने नववे स्थान पटकावले. तिने एकूण ५२.६९८ गुणांची कमाई केली.

‘५२.६९८ गुणांची कमाई केल्यानंतर दीपाला ऑलिम्पिक पात्रता मिळेल याची खात्री होती. अजून तीन सबडिव्हीजन बाकी होते, परंतु तिने तीन देशांच्या जिम्नॅस्टिना आधीच पराभूत केले होते. त्यामुळे ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली,’ अशी माहिती आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी दीपक काग्रा यांनी वृत्तसंस्थेला दिली. ते पुढे म्हणाले, ‘ या स्पध्रेत ३३ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता आणि तिला तीन देशांच्या खेळाडूंपेक्षा अधिक गुणांची कमाई करायची होती. त्यात ती यशस्वी ठरली.’’

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आर्टिस्टिक प्रकारातील काही फेऱ्या सुरू होत्या.  गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दीपा रिओवारी पक्की करू शकली नाही. २०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दीपाने कांस्यपदक पटकावले होते.

 

बंगळुरू एफसीला आय-लीगचे जेतेपद

बंगळुरु : बंगळुरू एफसी संघाने रविवारी साळगावकर संघावर २-० असा विजय मिळवताना आय-लीग फुटबॉल अजिंक्यपद स्पध्रेच्या जेतेपदावर नाव कोरले. गेल्या तीन वर्षांतील बंगळुरू संघाचे हे दुसरे अजिंक्यपद आहे.  युगेन्सन लिंगडोह (८ मि.) आणि सेमीन्लेन डाँगल (८७ मि.)  यांनी प्रत्येकी एक गोल केला. येथील श्री कांतिरावा स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या लढतीत बंगळुरूने विजय मिळत १५ सामन्यांनंतर सर्वाधिक ३२ गुणांसह जेतेपद निश्चित केले. २०१३-१४ हंगामात बंगळुरूने पदार्पणातच आय-लीगमध्ये बाजी मारली होती.

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dipa karmakar just became the first ever indian gymnast to qualify for the olympics