जागतिक कलात्मक : जिम्नॅस्टिक्स स्पर्धा
भारतीय पुरुष खेळाडूंनी ४९व्या जागतिक कलात्मक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत मंगळवारी निराशा केली. भारताच्या एकाही जिम्नॅस्टिक्सपटूला अष्टपैलू किंवा वैयक्तिक प्रकाराच्या अंतिम फेरीत मजल मारण्यात अपयश आले.
अष्टपैलू प्रकाराच्या पात्रता फेरीत योगेश्वर सिंग याने ७६.०९७ गुणांसह भारताकडून सर्वोत्तम कामगिरी करत ९२वे स्थान पटकावले. २०१०च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता आशीष कुमार (७३.६३२ गुण) आणि आदित्य राणा (७३.०९८) यांना अनुक्रमे १२२व्या आणि १२८व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. फ्लोअर एक्सरसाइज प्रकारात आशीष (१३.५०० गुण), आदित्य (१३.०००) आणि योगेश्वर (१२.८६६) यांनी अनुक्रमे ७७वे, १२५वे आणि १३६वे स्थान प्राप्त केले.
पॉमेल हॉर्स प्रकारात, योगेश्वर १२.७०० गुणांसह ७५वा आला, तर आदित्य (१०.५३३) आणि आशीष (१०.१००) यांना अनुक्रमे १७३व्या आणि १८२व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
समांतर बार प्रकारातही अपयशाची मालिका सुरूच राहिली. आशीष (१३.१००), आदित्य (१३.०६६) आणि योगेश्वर (१२.७६६) यांनी अनुक्रमे १०२वे, १६४वे आणि १७३वे स्थान प्राप्त केले. त्याआधी प्रणती नायक, प्रणती दास आणि अरुणा रेड्डी या भारतीय महिलांनाही वैयक्तिक प्रकारात अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले होते.