Joe Root Completed 7000 Runs In ODI Cricket: इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट हा फॅब ४ फलंदाजांपैकी एक आहे. वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या फलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला आहे. सध्या तो तुफान फॉर्ममध्ये आहे. वेस्टइंडिजविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. वेस्टइंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे त्याने इंग्लंडला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या सामन्यात त्याने त्रिशतकी खेळी केली. यादरम्यान त्याने इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
वेस्टइंडिजविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना अवघ्या ४२ धावा करताच जो रूटने इतिहास रचला आहे. जो रूट हा वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड इंग्लंडचा माजी कर्णधार ओएन मॉर्गनच्या नावावर होता. मॉर्गनने ६९५७ धावा केल्या होत्या. आता रूटने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करत ७००० धावांचा पल्ला गाठला आहे. यासह वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रूट अव्वल स्थानी पोहोचला आहे.
इंग्लंड संघातील प्रमुख फलंदाज
जो रूट हा इंग्लंड संघातील प्रमुख फलंदाज आहे. त्याला २०१३ मध्ये इंग्लंडच्या वनडे संघांसाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. सध्या तो संघातील सर्वात अनुभवी फलंदाज आहे. त्याच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १७९ सामन्यांमध्ये ७००० हून अधिक धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १७ शतकं आणि ४२ अर्धशतकं झळकावली आहेत.
इंग्लंडचा दमदार विजय
या मालिकेतील दुसरा सामना सोफीया गार्डन्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्टइंडिजला ३०८ धावा करता आल्या. वेस्टइंडिजकडून ब्रेंडन किंगने सलामीला फलंदाजी करताना ५९ धावांची खेळी केली. तर केसी कार्टीने १०३ धावांची खेळी केली. कर्णधार शाय होपने ७८ धावा करत संघाची धावसंख्या ३०० पार पोहोचवली. या धावांचा पाठलाग करत असताना इंग्लंडकडून जो रूटने नाबाद १६६ धावांची खेळी केली. कर्णधार हॅरी ब्रूकने ४७ आणि विल जॅक्सने ४९ धावांची खेळी करत इंग्लंडला ३ गडी राखून विजय मिळवून दिला.