रॉय हॉजसन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या इंग्लंडने युरो चषक फुटबॉल स्पध्रेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र स्लोव्हाकियाने अखेरच्या साखळी लढतीत गोलशून्य बरोबरीत रोखल्यामुळे ‘ब’ गटातील विजेते म्हणून बाद फेरी गाठण्याचे इंग्लंडचे स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकले नाही. आता तिसऱ्या स्थानावरील सर्वोत्तम चौघांमध्ये स्लोव्हाकियाला स्थान मिळवता आले, तरच ते आगेकूच करू शकतात. त्यांचा गोलरक्षक मॅटस कोझाकिकने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करीत इंग्लंडचे प्रयत्न हाणून पाडले.
आता सोमवारी उपउपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडचा ‘फ’ गटातील उपविजेत्या संघाशी म्हणजे हंगेरी किंवा पोर्तुगालशी सामना होणार आहे. सेंट इटीने येथे झालेला हा सामना इंग्लिश चाहत्यांसाठी आणखी एक निराशाजनक सामना ठरला. याच मैदानावर १९९८च्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेत अर्जेटिनाने पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या लढतीत इंग्लंडचा पराभव केला होता.
या सामन्यात हॉजसन यांनी सहा बदल केले. वेल्सविरुद्धच्या विजयाचे शिल्पकार जॅमी व्हॅर्डी आणि डॅनियल स्टुरिडजे यांच्यावर सुरुवातीपासून आक्रमणाची जबाबदारी सोपवली.
स्लोव्हाकियाचे प्रशिक्षक यान कोझाक यांनी मात्र रशियाला २-१ असे नमवणाऱ्या चमूवरच विश्वास ठेवणे पसंत केले. व्हॅर्डीने गोल करण्याचे अतोनात प्रयत्न केले, परंतु त्याला अपयश आले. पहिल्या सत्रात इंग्लंडला ९ वेळा व स्लोव्हाकियाला एकदा गोल करण्याची संधी मिळाली होती. दुसऱ्या सत्रातही इंग्लंडला गोलसाठी झगडावे लागले. ५६व्या मिनिटाला जॅक विल्शेरेच्या जागी रूनी मैदानावर आला.