‘‘मला आता इतरांवर आणखी ओझं व्हायचं नाही, म्हणूनच मी माझं आयुष्य संपवत आहे’’, हेच शेवटचं वाक्य लिहून मिशेल ऊर्फ मिशे ब्रॉडनं आपली जीवनयात्रा संपवली. मेंदूशी संदर्भात मोटर-न्यूरॉन नावाच्या गंभीर आजारानं तिला ग्रासलं होतं. गोल्फच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा तिनं यशस्वीपणे आयोजित केल्या. मिशेचा जनसंपर्क दांडगा होता. त्यामुळे तिनं अनेक माणसं जोडली, परंतु १६ महिने या आजाराशी झुंजत असताना अखेरच्या दिवसांत तिची वाचा गेली. हे अबोल आयुष्य जगतानाही तिनं हार मानली नाही. ती अनेक लोकांना ई-मेल आणि पत्र पाठवायची, परंतु व्हीलचेअरवरचं जगणं आणि कुटुंबावरचं ओझं तिला कमी करायचं होतं. अखेर स्वत:वरच औषधी गोळ्यांचा भडिमार करून तिनं आत्महत्या केली. ६ जुलै २०१० या दिवशी तिला इंग्लंडच्या क्वीन्स वैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे मिशेनं जगाचा निरोप घेतला. क्रीडाक्षेत्रातच वावरणाऱ्या ब्रॉड कुटुंबीयांवर आभाळ कोसळलं. आयसीसीनं सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांना तातडीनं दीर्घ रजा मंजूर केली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि संघाची सांख्यिकीतज्ज्ञ गेम्मा या भावाबहिणीलाही निर्णय घ्यायचा होता, परंतु ८ जुलैला इंग्लंडचा बांगलादेशशी पहिला एकदिवसीय सामना होणार होता. अशा या कठीण प्रसंगात स्टुअर्ट आणि गेम्मा यांनी राष्ट्राची सेवा करण्याचीच भूमिका स्वीकारली. वडिलांनीही मुलांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. स्वीकारलेली आव्हानं अर्धवट टाकून परतू नका, असा आदेश त्यांनी मुलांना दिला. स्टुअर्ट बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात खेळला आणि ४३ धावांत २ बळी मिळवले. तर इंग्लिश वेगवान त्रिकुटानं बांगलादेशच्या फलंदाजांची दाणादाण उडवली.
मिशे ही स्टुअर्ट-गेम्माची सावत्र आई. पण या दोघांनाही तिच्याविषयी आस्था होती. मिशेच्या आयुष्याच्या लढय़ात सर्वानी तिला साथ दिली. तिच्या निधनानंतर ब्रॉड कुटुंबीयांनी मोटर-न्यूरॉन रोगाशी झुंजणाऱ्या व्यक्तींसाठी काहीतरी करायचं ठरवलं. हे कार्य मिशे जिवंत असतानाच त्यांनी सुरू केलं होतं. ब्रॉड कुटुंबीयांनी या उद्देशानं क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं. याचप्रमाणे या आजारासंदर्भातील जाणीव-जागृती निर्माण करण्याचं कार्यही त्यांचं अथक सुरू आहे. ‘द ब्रॉड अपील’ नावाची वेबसाइट याच प्रेरणेनं त्यांनी काढली आहे.
घरी खेळाचा वारसा लाभलेल्या स्टुअर्टनं वडिलांच्या पावलांवर पावलं टाकत बालपणीच सलामीवीर फलंदाज म्हणून आपल्या कारकीर्दीला प्रारंभ केला. लिसेस्टरशायर काऊंटी संघाकडून त्यानं फलंदाज म्हणून चांगलं नाव कमावलं. पण १७व्या वर्षी त्यानं वेगवान गोलंदाजीकडे अधिक लक्ष दिलं. नेमक्या याच वर्षी हॉकीमध्ये गोलरक्षक म्हणूनही तो चर्चेत आला. दुर्दैवानं राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याची त्याची संधी हुकली. परंतु क्रिकेटला मात्र स्टुअर्टच्या निमित्तानं एक अष्टपैलू तारा मिळाला. शुक्रवारी नॉटिंगहॅमच्या घरच्या मैदानावर स्टुअर्ट ऑस्ट्रेलियासाठी कर्दनकाळ ठरला. १५ धावांत ८ बळी या त्याच्या पराक्रमानं कांगारूंचा संघ फक्त ६० धावांत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. इंग्लंडनं चौथ्या कसोटीसह मालिकेवरही नाव कोरलं. २००९, २०११ आणि यंदाच्या अ‍ॅशेस विजेत्या इंग्लिश संघात स्टुअर्टचं स्थान सहजपणे अधोरेखित होतं. याच कसोटीत ब्रॉडनं तीनशे बळींचा आकडाही ओलांडला.
२००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानं स्टुअर्टचं नाव क्रिकेटच्या विक्रमांच्या पुस्तकात नोंदलं गेलं. कारण भारतीय फलंदाज युवराज सिंगने त्याच्या षटकातील सहाही चेंडूंवर षटकारांची आतषबाजी केली. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील ते सर्वात महागडं षटक ठरलं. परंतु आयुष्यातील या कठीण वळणावर तो थांबला नाही, तर इंग्लिश क्रिकेटला अनेक सुखद क्षण त्यानं दिले. २००९च्या अ‍ॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटीत ३७ धावांत ५ बळी घेत त्यानं सामनावीर किताब पटकावला होता. ऑगस्ट २०१०मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यानं पहिलंवहिलं कसोटी शतक झळकावलं. १६९ धावांची ही खेळी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून साकारलेली दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. मग २०११मध्ये नॉटिंगहॅम येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्यानं हॅट्ट्रिक नोंदवण्याचा करिष्मा दाखवला. या वेळी त्याच्या खात्यावर ४६ धावांत ६ बळी जमा होते. २०१२मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यानं ७२ धावांत ७ बळी घेण्याचं कर्तृत्व दाखवलं होतं. त्या कसोटीत त्यानं ११ बळी घेतले होते. जगाला क्रिकेट खेळाचा कानमंत्र देणाऱ्या इंग्लंडनं २०१०मध्ये ट्वेन्टी-२० या प्रकारात जगज्जेतेपद जिंकण्याचा बहुमान मिळवला. या संघातसुद्धा स्टुअर्ट होता. या लक्षवेधी कामगिरीप्रमाणेच सहा फूट सहा इंच उंची लाभलेल्या स्टुअर्टनं मैदानावरील आपल्या वागणुकीमुळे अनेकदा दंडही भरला आहे.
स्टुअर्टची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आता दहा वर्षांची झाली आहे. तो आता इंग्लंड संघाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. मात्र त्याची बहीण गेम्मा इंग्लंड संघाची नोकरी सोडून आता तिच्या जन्मस्थळी न्यूझीलंडला स्थायिक झाली आहे. तरीही आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचं सामाजिक कार्य निरंतर सुरू
आहे.
प्रशांत केणी -prashant.keni@expressindia.com