आनंद असो किंवा दु:ख त्यावर मूत्रविसर्जनाचाच उतारा होऊ शकतो, असा इंग्लंडमध्ये कदाचित शिरस्ता असावा. कारण इंग्लंडचे खेळाडू आनंदात असो किंवा दु:खात ते आपल्या या अश्लील प्रकारांनी स्वत:बरोबरच देशाचे आणि क्रिकेटच्या नावाला काळीमा फासणारे कृत्य करताना दिसत आहेत.
ओव्हलचा अ‍ॅशेसमधील अखेरचा सामना अनिर्णित राहीला असला तरी इंग्लंडने ही मालिका ३-० अशी खिशात टाकली होती. सामना संपल्यानंतर इंग्लंडचा संघ ‘श्ॉम्पियन’मध्ये न्हाऊन निघाला, त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये त्यांनी बराच धिंगाणा घातला आणि या उन्मादात संघातील काही खेळाडूंनी ओव्हलच्या खेळपट्टीवर मूत्रविसर्जन केले.
काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार अखेरचा सामना संपल्यावर काही तासांनी इंग्लंडचे काही खेळाडू ओव्हलच्या खेळपट्टीवर जमा झाले आणि त्यांनी मूत्र विसर्जन केले. या खेळाडूंमध्ये स्टुअर्ट ब्रॉड, केव्हिन पीटरसन आणि जेम्स अँडरसन यांचा समावेश होता.