ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पारंपारिक द्वंद्व असलेल्या प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस मालिका विजयापासून इंग्लंडचा संघ केवळ काही क्षण दूर आहे. ऑस्ट्रेलियाला ६० धावांत गुंडाळलेल्या इंग्लंडने ३९१ धावांवर पहिला डाव घोषित केला. बेन स्टोक्सच्या पाच बळींच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची अवस्था ७ बाद २४१ अशी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ अजूनही ९० धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचे अ‍ॅशेस विजयाचे स्वप्न साकार होऊ शकते.
४ बाद २७४ वरून पुढे खेळणाऱ्या इंग्लंडने आक्रमक पवित्रा स्वीकारत आघाडी वाढवली. मात्र केवळ सहा धावांची भर घालून शतकवीर जो रुट परतला. मिचेल स्टार्कने त्याला बाद केले. रुटने १९ चौकार आणि एका षटकारासह १३० धावांची खेळी केली. नाइटवॉचमन मार्क वूडला बाद करीत स्टार्कने पाचव्या बळीची नोंद केली. अष्टपैलू बेन स्टोक्स हेझलवूडची शिकार ठरला. त्याने ५ धावा केल्या. यष्टीरक्षक जोस बटलरचा स्टार्कने त्रिफळा उडवला. त्याला केवळ १२ धावा करता आल्या. मोईन अलीने चौकारांची लयलूट करीत धावफलक हलता राहील याची काळजी घेतली. मिचेल जॉन्सनने मोईन अलीला बाद केले. अलीने २४ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ३८ धावांची खेळी केली. इंग्लंडने ९ बाद ३९१ धावांवर पहिला डाव घोषित केला. मिचेल स्टार्कने १११ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. इंग्लंडला ३३१ धावांची आघाडी मिळाली.
पहिल्या डावात खराब प्रदर्शन करणाऱ्या डेव्हिड वॉर्नर आणि ख्रिस रॉजर्स यांनी ११३ धावांची शतकी सलामी दिली. मात्र या भागीदारीदरम्यान दोघांनाही जीवदान मिळाले. ही जोडी इंग्लंडची डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच इंग्लंडचा कर्णधार कुकने चेंडू बेन स्टोक्सकडे सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत स्टोक्सने रॉजर्सला जो रुटकडे झेल देण्यास भाग पाडले. रॉजर्सने १० चौकारांसह ५२ धावांची खेळी केली. आक्रमक पवित्र्यासाठी प्रसिद्ध वॉर्नरला स्टोक्सनेच उसळत्या चेंडूवर चकवले. ब्रॉडने त्याचा सुरेख झेल टिपला. वॉर्नरने ९ चौकार आणि २ षटकारांसह ६४ धावांची खेळी केली. शॉर्न मार्श २ धावा करुन तंबूत परतला. भरवशाच्या स्टीव्हन स्मिथने ब्रॉडच्या गोलंदाजीवर स्टोक्सच्या हाती झेल दिला. त्याने केवळ २ धावा केल्या. मायकेल क्लार्क या डावातही मोठी खेळी करू शकला नाही. मार्क वूडने त्याला १३ धावांवर बाद केले. ५ बाद १७४ अशी घसरण झालेल्या ऑस्ट्रेलियाला पीटर नेव्हिल आणि अ‍ॅडम व्होग्स यांच्या ५० धावांच्या भागीदारीने सावरले. मात्र बेन स्टोक्सचा चेंडू न खेळण्याचा नेव्हिलचा निर्णय चुकला. त्याने १७ धावा केल्या. मिचेल जॉन्सनला कुककडे झेल देण्यास भाग पाडत स्टोक्सने डावातील पाचव्या विकेटची नोंद केली. इंग्लंड दुसऱ्याच दिवशी कसोटी जिंकणार असे चित्र होते. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आल्याने इंग्लंडचा विजय तिसऱ्या दिवसावर गेला. अ‍ॅडम व्होग्स ४८ तर मिचेल स्टार्क शून्यावर खेळत आहेत.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : सर्व बाद ६० (मिचेल जॉन्सन १३, स्टुअर्ट ब्रॉड ८/१५) आणि (दुसरा डाव):  ७ बाद २४१ (डेव्हिड वॉर्नर ६४, ख्रिस रॉजर्स ५२, बेन स्टोक्स ५/३५) विरुद्ध इंग्लंड (पहिला डाव) : ९ बाद ३९१ डाव घोषित (जो रुट १३०, जॉनी बेअरस्टो ७४, मिचेल स्टार्क ६/११)