Nat Sciver Brunt Record: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत वेस्टइंडिजचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात इंग्लंड आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेवर ८९ धावांनी विजय मिळवून विजयाची हॅट्रीक पूर्ण केली. या सामन्यात इंग्लंडची स्टार अष्टपैलू खेळाडू नॅट शिवर ब्रंटने दमदार कामगिरी केली. तिने इंग्लंडकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना ११७ धावांची दमदार खेळी केली. हे तिच्या वर्ल्डकप कारकिर्दीतील ५ वे शतक ठरले आहे. दरम्यान या खेळीच्या बळावर इंग्लंडने ५० षटकांअखेर ९ गडी बाद २५३ धावा केल्या.

श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी २५४ धावा करायच्या होत्या. या धावांचा बचाव करतानाही नॅट शिवर ब्रंटने मोलाचं योगदान दिलं. तिने धावांचा बचाव करताना ५ षटकं गोलंदाजी केली. यादरम्यान तिने अवघ्या २५ धावा खर्च केल्या आणि १ फलंदाजाला बाद करत माघारी धाडलं. तर कर्णधार सोफी एक्लेस्टनने १० षटक गोलंदाजी केली आणि अवघ्या १७ धावा खर्च करत ४ गडी बाद केले. या सामन्यात दमदार कामगिरी करून नॅट शिवर ब्रंटने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पाचव्यांदा असं घडलं

या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर नॅट शिवर ब्रंटने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तिने या स्पर्धेत शतक आणि गोलंदाजी करताना २ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पाचव्यांदा असं घडलं आहे. पण मुख्य बाब अशी की, नॅट शिवर ब्रंटने वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात २ वेळा अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिाला खेळाडू ठरली आहे. याआधी कुठल्याही खेळाडूला २ वेळा शतक आणि गोलंदाजी करताना २ गडी बाद करण्याचा पराक्रम करता आलेला नाही.

वर्ल्डकप स्पर्धेत शतक आणि २ गडी बाद करणाऱ्या महिला क्रिकेटपटू

एनिड बॅकवेल (इंग्लंड)- ११८ धावा, २ विकेट विरूद्ध ऑस्ट्रेलिया, १९७३
मरिजेन कॅप (दक्षिण आफ्रिका)- १०२ धावा आणि ३ विकेट विरूद्ध पाकिस्तान, २०१३
हेली मॅथ्यूज (वेस्टइंडिज)- ११९ धावा आणि २ विकेट विरूद्ध न्यूझीलंड, २०२२
नॅट शिवर ब्रंट (इंग्लंड) १०९ धावा आणि २ विकेट विरूद्ध ऑस्ट्रेलिया, २०२२
नॅट शिवर ब्रंट (इंग्लंड) ११७ धावा आणि २ विकेट विरूद्ध श्रीलंका, २०२५