Best Crowd Catch Ever in SA vs AUS 1st T20I Video: आपण क्रिकेटच्या मैदानावर अनेक अचंबित करणारे झेल पाहिले आहेत. डाईव्ह करत, हवेत उंच उडी मारत किंवा मग एकाहाताने टिपलेले झेल असोत, खेळाडूंची कमाल कामगिरी आपण पाहिली आहे. पण आता ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात प्रेक्षकाने टिपलेल्या कॅचचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

टीम डेव्हिड दक्षिण आफ्रिकाविरूद्ध सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस पाडत फलंदाजी करत होता. यादरम्यानच एका षटकारासाठी गेलेल्या चेंडूचा प्रेक्षकाने एकहाताने झेल टिपला. आकर्षक गोष्ट म्हणजे त्याने एका हातात दोन बीयरचे कॅन असताना डाव्या हाताने हा झेल टिपला.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्यांची टी-२० मालिका रविवार १० ऑगस्टपासून सुरू झाली. डार्विनमध्ये झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत १७८ धावा केल्या. अखेरीस सांघिक कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेला अवघ्या १७ धावांनी पराभूत केलं.

टीम डेव्हिडच्या षटकारावर चाहत्याने टिपला सर्वाेत्कृष्ट झेल

ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यात स्फोटक फलंदाज टिम डेव्हिडने शानदार खेळी केली, ज्यामध्ये अनेक षटकारांचा समावेश होता. पण यादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी त्याला दोन वेळा जीवदान दिले होते. ज्याचा फायदा टीम डेव्हिडने उचलत वादळी फटकेबाजी केली.

दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू चेंडू पकडण्यात अपयशी ठरले पण टिम डेव्हिडच्या फटक्यावर एका चाहत्याने कमालीचा झेल टिपला. ही घटना १३ व्या षटकात घडली, जेव्हा कॉर्बिन बॉश गोलंदाजी करत होता. बॉशच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर टिम डेव्हिडने पुल शॉट खेळला आणि चेंडू थेट मिडविकेट सीमेबाहेर गेला. चेंडू षटकारासाठी गेला, पण यादरम्यान चाहत्याने उभं राहत डाव्या हाताने अचंबित करणारा झेल टिपला.

चाहत्याने टिपलेला हा झेल खास होता कारण त्याने उजव्या हातात दोन बिअर कॅन धरले होते आणि ते न सोडता त्याने फक्त एका हाताने झेल पकडला. चाहत्याने हा झेल टिपताच सर्वच प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. तर समालोचकही त्याने टिपलेला झेल पाहून अचंबित झाले होते.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात संघाचा डाव सावरत दमदार फटकेबाजी केली. टीम डेव्हिडने फक्त ५२ चेंडूत ८३ धावा केल्या. त्याने या खेळीदरम्यान ८ गगनचुंबी षटकार लगावले, त्यापैकी एक १०९ मीटर लांब षटकार होता, तर दुसरा स्टेडियमच्या छतावर आदळला. याशिवाय त्याने ४ चौकारही मारले. डेव्हिड व्यतिरिक्त, कॅमेरॉन ग्रीनने फक्त १३ चेंडूत ३५ धावा केल्या.