भारताच्याच आठ खेळाडूंची पुरुष आणि महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक
मुंबई : पुण्यातील पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत यजमान भारताच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्वाची मालिका शुक्रवारीही कायम राखली. १६ देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील पुरुष आणि महिला या दोन्ही एकेरी गटाच्या उपांत्य फेरीत भारताच्याच आठ खेळाडूंनी प्रवेश केला आहे.
पुरुष एकेरीच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यांत इर्शाद अहमदने श्रीलंकेच्या माजी विश्वविजेत्या निशांत फर्नाडोला ७-२५, २५-१२, २५-७ असे संघर्षमय लढतीत पराभूत केले. राष्ट्रीय विजेत्या प्रशांत मोरेने बांगलादेशच्या मोहम्मद मोल्लाला २५-८, २५-२० असे नमवले. स्विस लीग विजेत्या झहीर पाशाने श्रीलंकेच्या शाहीद इल्मीला २५-१५, २५-१० अशी धूळ चारली. अखेरच्या उपांत्यपूर्व लढतीत राजेश गोहिलने मालदीवच्या इस्माइल आजमीनचा २५-५, २५-५ असा सहज धुव्वा उडवला. उपांत्य फेरीत प्रशांत विरुद्ध राजेश आणि झहीर विरुद्ध इर्शाद असे सामने रंगतील.
महिला एकेरीतील प्रथम उपांत्यपूर्व सामन्यात एस. अपूर्वाने श्रीलंकेच्या मधुका दिलशानला २५-५, २५-२ असे नेस्तनाबूत केले. के. नागज्येतीने मालदीवच्या अमिनाद विधाधचा २५-०, २५-५ असा फडशा पाडला. राष्ट्रीय विजेत्या रश्मी कुमारीने श्रीलंकेच्या रोशिता जोसेफवर २५-०, २५-९ असा विजय मिळवला. रोमहर्षक चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात ऐशा खोकावालाने श्रीलंकेच्या रेबेका दलराईनवर २५-२४, २५-२४ अशी सरशी साधली. अंतिम फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी अपूर्वापुढे नागज्योतीचे आव्हान असेल, तर रश्मीची गाठ ऐशाशी पडणार आहे.