देशातील सर्वोच्च अशा पद्मभूषण पुरस्कारासाठी माझी शिफारस मला आगामी कारकीर्दीकरिता प्रेरणादायक ठरणार आहे, असे भारताचा ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता मल्ल सुशील कुमार याने सांगितले.
लागोपाठ दोन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये पदक मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याची किमया सुशील कुमारने केली आहे. पद्मभूषण पुरस्काराची शिफारस म्हणजे आजपर्यंत मी कुस्ती क्षेत्रात जी मेहनत केली आहे, त्याचेच हे फळ असल्याचे मी मानतो. हा पुरस्कार मिळाल्यावर कुस्ती क्षेत्राचाच गौरव होणार आहे त्यामुळे मी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे आभारच मानणार आहे, असे सुशीलने सांगितले.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने यंदाच्या पद्मभूषण पुरस्कारासाठी सुशील कुमार व भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांची शिफारस केली आहे. सुशीलला २००९मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार व २०११मध्ये पद्मश्री किताब मिळाला होता. यंदा पद्मश्री किताबाकरिता ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता नेमबाज विजय कुमार, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त यांची शिफारस केली आहे. या दोन्ही खेळाडूंना गतवर्षी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Feels privileged says sushil on padma bhushan recommendation