आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदावरून सेप ब्लाटर यांनी त्वरित पायउतार व्हावे, ही युरोपियन संसदेने केलेली मागणी ब्लाटर यांनी फेटाळली आहे.
फिफाचे नवीन अध्यक्ष निवडून येईपर्यंत आणखी सहा-सात महिन्यांचा कालावधी लागणार आहे. ब्लाटर यांनी पदाचा त्याग करीत त्यांच्याऐवजी प्रभारी अध्यक्ष नियुक्त करावा असा ठराव युरोपियन संसदेने केला आहे. फिफामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी नवीन अध्यक्षांची आवश्यकता आहे, असाही ठराव त्यांनी केला आहे.
फिफाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘‘ब्लाटर यांनी ही मागणी धुडकावून लावली आहे. नवीन अध्यक्ष नियुक्त करण्यासाठी, तसेच महासंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ब्लाटर यांनी महासंघाचे विशेष अधिवेशन घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ही तारीख निश्चित करण्यासाठी झुरिच येथे २० जुलै रोजी कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.’’
दरम्यान, फिफाचे जनसंपर्क व सार्वजनिक व्यवहार समितीचे संचालक वॉल्टर डी ग्रिगोरिओ यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी निकोलस मैन्गोट यांची प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वॉल्टर हे या वर्षांअखेपर्यंत सल्लागार म्हणून काम करतील.
फिफाचे सरचिटणीस जेरोमी व्हाल्के यांनी वॉल्टर यांच्या कार्याचे कौतुक करीत सांगितले की, ‘‘वॉल्टर यांनी फिफाच्या विविध उपक्रमांना अधिकाधिक प्रसिद्धी मिळावी यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच त्यांनी जरी राजीनामा दिला असला तरी आम्ही त्यांना या वर्षअखेपर्यंत सल्लागार म्हणून काम करण्याची विनंती केली आहे.’’
‘‘सेप ब्लेटर व व्हाल्के हे पोलिसांच्या मोटारीतून जात असल्याचा विनोद केला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली तसेच त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त येथील काही वृत्तपत्रांनी दिले आहे,’’ असे वॉल्टर यांनी एक वृत्तवाहिनीला सांगितले.