खेळाच्या प्रसार व प्रचाराबाबत आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) ही जगातील सर्वोत्तम क्रीडा संस्था आहे मात्र आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे या संस्थेवर सध्या मोठे गंडांतर आले आहे. हे संकट त्वरित दूर होण्याची आवश्यकता आहे, असे नेदरलँड्सचा अव्वल दर्जाचा फुटबॉलपटू रॉन व्लार याने येथे सांगितले.
रॉन याने पुणे सेंटर येथे सुरू असलेल्या ‘फुटसाल’ (पाच खेळाडूंचा फुटबॉल) अकादमी तसेच भारत क्लबच्या खेळाडूंना मार्गदर्शन केले. पत्रकारांशी संवाद साधताना तो म्हणाला, फिफावरील आरोपांबाबत अद्याप ठोस पुरावे उपलब्ध झालेले नाहीत. जर त्याबाबत पुरावे असतील तर संबंधितांनी लवकरात लवकर ते लोकांसमोर आणावेत व दोषी व्यक्तींवर तत्पर कारवाई करीत स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्ती फिफावर आणाव्यात. जे काही घडले ते या खेळाच्या प्रतिष्ठेस खूप हानिकारक आहे.
भारत हा क्रिकेटचा देश आहे मात्र फुटबॉलबाबतही येथे खूप औत्सुक्य आहे. येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लीगमध्ये आमच्या देशाचे खेळाडू व प्रशिक्षकांचा सहभाग असतो. त्यांच्याकडून मला अनेक वेळा भारतीय लोकांमध्येही फुटबॉलबाबत किती उत्कंठा हे कळले होते. त्यामुळे भारताबाबत मलाही उत्सुकता निर्माण झाली होती. येथे आल्यानंतर मी खूपच भारावून गेलो आहे. येथे मला पुन्हा यायला नक्कीच आवडेल असे रॉन याने सांगितले.
भारतीय फुटबॉल लीग (आयएसएल) या स्पर्धेत युरोपातील अनेक खेळाडू भाग घेत असल्यामुळे त्यांच्याबरोबर खेळण्याचा फायदा भारतीय खेळाडूंना मिळत आहे. या अनुभवाचा फायदा घेत येथील खेळाडूंनी आपल्या कौशल्यात सुधारणा केली पाहिजे. तसेच या लीगद्वारे हा खेळ अधिकाधिक लोकप्रिय कसा होईल याचा विचार भारतीय संघटकांनी केला पाहिजे. २०१७ मध्ये भारतात १७ वर्षांखालील गटाची विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. फुटबॉल हा खेळ घराघरात नेण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यांचे थेट प्रक्षेपण देशातील सर्व वाहिन्यांद्वारे दाखविले गेले तर या खेळाची लोकप्रियता शिखरावर पोहोचेल असेही रॉन याने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2015 रोजी प्रकाशित
फिफावरील गंडांतर ही दुर्दैवी गोष्ट -रॉन व्लार
खेळाच्या प्रसार व प्रचाराबाबत आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) ही जगातील सर्वोत्तम क्रीडा संस्था आहे मात्र आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे या संस्थेवर सध्या मोठे गंडांतर आले आहे. हे संकट त्वरित दूर होण्याची आवश्यकता आहे, असे नेदरलँड्सचा अव्वल दर्जाचा फुटबॉलपटू रॉन व्लार याने …

First published on: 27-06-2015 at 06:17 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa lose his credibility due to malpractice