फिफा फुटबॉल विश्वचषकातील बाद फेरीतील सामन्यांचे निकाल रविवारी पहाटे कळतील. सामने सुरू होतील तसतसे भावांमध्ये चढउतार सुरू होतील. अगदी पहिला गोल कधी होईल, तो कोण करेल, सामना अनिर्णीत राहील का, अशा पैजा घेण्यास सुरुवात झाली आहे. सामना कोण जिंकतो, यापेक्षाही हरणाऱ्या संघावर लावलेल्या सट्टय़ाकडे सट्टेबाजांचे अधिक लक्ष असते. कारण त्यातच त्यांना नफा असतो. हा नफा आता आणखी वाढणार आहे. बाद फेरीतील सामन्यांवर सट्टा खेळणारे पंटर्स खूप आहेत. बाद फेरीत आलेले सर्वच संघ हे तुल्यबळ असल्यामुळे सट्टेबाजही भाव देताना पंटर्सना भुरळ घालत असतात. रविवारी होणाऱ्या सामन्यात नेदरलँड्सला सट्टेबाजांची पसंती आहे. त्यामुळे मेक्सिकोच्या बाजूने सट्टेबाजांनी फारसा भाव दिलेला नाही. मात्र कोस्टा रिका आणि ग्रीस यांच्यातील सामन्यात सट्टेबाजांनी पंटर्सना लालूच दाखविली आहे. कोस्टा रिकाला ७५ पैसे देणाऱ्या सट्टेबाजांनी ग्रीसला सव्वा रुपया असा भाव देऊन हे दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे पंटर्स गोंधळात पडत असतो. गोलकर्ते नेयमार आणि म्युलर यांच्यामध्ये कमालीची चुरस आहे. या दोन्ही गोलकर्त्यां फुटबॉलपटूंवर कोटय़वधी रुपयांचा सट्टा खेळला जात असल्याची माहिती एका सट्टेबाजाने दिली.
आजचा भाव :
नेदरलँड्स    मेक्सिको
३५ पैसे  (१५/१३);    अडीच रुपये (१४/५)
कोस्टा रिका    ग्रीस
७५ पैसे (६/४);    सव्वा रुपया (२३/१०)
(कंसात आंतरराष्ट्रीय दर)
निषाद अंधेरीवाला
नेयमारसेना
यंदाच्या विश्वचषकात ब्राझीलच्या विजयी वाटचालीचा शिल्पकार ठरला आहे युवा नेयमार. २२व्या वर्षीच संघाचा आधारस्तंभ ठरलेला नेयमार जगभरातल्या फुटबॉल रसिकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे.  नेयमारचा फोटो असलेले टी-शर्ट परिधान केलेले आणि नेयमारचा जयघोष करणाऱ्या चाहत्यांनी ‘नेयमारझेट्स’ नावाची चाहत्यांची सेनाच निर्माण केली आहे. यामध्ये महिला चाहत्यांची संख्या अफाट आहे.  नेयमारला ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी ही सेना गर्दी करते आहे. सामना हाऊसफुल असल्याने तिकीट न मिळाल्यास ब्राझीलच्या सराव शिबिरालाही गर्दी होत आहे. नेयमारच्या माध्यमातून फुटबॉलशी जोडल्या जाणाऱ्या मंडळींची संख्या वाढते आहे. नेयमारला चाहत्यांच्या या सेनेची कल्पना असून, ट्विटरच्या माध्यमातून तो या चाहत्यांशी संवादही साधतो.
दृष्टी पल्ल्याड..
क्रीडापटूंना मिळणारे चाहत्यांचे प्रेम हे शब्दातीत असते.  चेहऱ्यावर, शरीरावर ब्राझीलचा झेंडा रंगवलेले आणि उत्साहात संघाला समर्थन देणारे चाहते ब्राझीलच्या लढतींचे वैशिष्टय़ आहे. मात्र हे सगळे पुरेसे नाही म्हणूून ब्राझीलच्या एका कट्टर चाहत्याने थेट डोळ्यांमध्येच ब्राझीलच्या झेंडय़ाला सामावून घेतले आहे. कॉन्टॅक्स लेन्समध्ये त्याने चक्क ब्राझीलचा झेंडा बसवून घेतला आहे.