विश्वचषकातल्या प्रत्येक विजयागणिक घरच्या मैदानावर विश्वविजेतेपद पटकावण्याचे ब्राझीलचे स्वप्न जवळ येत आहे. कोलंबियाविरुद्धच्या विजयानंतर यजमान ब्राझीलने उपांत्य फेरीत धडक मारली. या महत्त्वपूर्ण विजयानंतर ब्राझीलच्या चाहत्यांनी जोरदार जल्लोष करत हा विजय साजरा केला. या विजयाने भारावून गेलेल्या काही चाहत्यांनी समुद्रात डुबकी मारून आनंद साजरा केला. काहीजणांनी बीअरचे कॅन हवेत उडवत ब्राझीलच्या प्रयत्नांना दाद दिली तर काहीजणांनी फटाके फोडून संघाला पाठिंबा दिला.
रिओ दी जानिरोमधील कोपाकॅबाना समुद्र किनाऱ्यापासून, साओ पावलोमधील पब्स आणि बापर्यंत तसेच राजधानी ब्राझिलियामधील समर्थकांनी संपूर्ण रात्र जागून विजयाचा आनंद साजरा केला. प्रत्येक सामन्यात ब्राझील कामगिरीत सुधारणा करत आहे. विश्वविजेतेपदाचे ते खरे दावेदार आहेत. या संघाने चाहत्यांची मने जिंकून घेतली आहेत असे १८ वर्षीय व्हिनीसिअस मोरइस या चाहत्याने सांगितले. ब्राझीलचा सामना पाहण्यासाठी कोपाकॅबाना समुद्रकिनाऱ्यावर भव्य पडद्याची व्यवस्था करण्यात आली होती. तब्बल २५,००० ब्राझीलकरांनी या सामन्याचा आनंद लुटला. सामना संपल्याची शिट्टी वाजताच शंभरहून अधिक चाहत्यांनी पाण्यात धाव घेतली. ‘आय एम ब्राझिलियन’ हे गाणे गात बहुतांशी ब्राझीलकरांनी फटाक्यांची आतषबाजीही केली.
अंतिम लढतीत आम्ही अर्जेटिनावर मात करून जेतेपद पटकावणार आहोत. दक्षिण अमेरिकेतील दोन कट्टर प्रतिद्वंद्वीमधील हा सामना चुरशीचा होईल यात शंकाच नाही, असे बेभान झालेल्या साओ पावलोतील एका चाहत्याने सांगितले.
१९५० साली ब्राझीलमध्ये आयोजित विश्वचषकात अंतिम लढतीत उरुग्वेने ब्राझीलवर मात केली होती. त्यानंतर घरच्या मैदानावर विश्वचषक पटकावण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. पण यंदा हे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याची सुवर्णसंधी ब्राझीलच्या संघाकडे आहे.
ब्राझीलचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिल्यास ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षा दिलमा रौसेफ यांच्यासाठीही तो मोठा धक्का असणार आहे. विश्वचषकाच्या आयोजनासाठी कोटय़वधी रुपये खर्च केल्याप्रकरणी तसेच पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी रौसेफ यांच्या सरकारवर कडाडून टीका झाली होती. ब्राझील संघाच्या यशस्वी वाटचालीमुळे या गोष्टींकडे ब्राझीलकरांचे दुर्लक्ष झाले आहे. विश्वचषकात ब्राझीलचा प्रवास अर्धवट संपुष्टात आल्यास ब्राझीलकर या गोष्टींविषयी पुन्हा आंदोलन छेडण्याची शक्यता आहे. म्हणूनच रौसेफ त्यांनी समारोप सोहळ्याला येणे टाळले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jul 2014 रोजी प्रकाशित
कोलंबियाविरुद्धच्या विजयानंतर ब्राझीलवासीयांचा जल्लोष
विश्वचषकातल्या प्रत्येक विजयागणिक घरच्या मैदानावर विश्वविजेतेपद पटकावण्याचे ब्राझीलचे स्वप्न जवळ येत आहे.

First published on: 06-07-2014 at 01:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2014 brazil celebrates after a spirited victory against colombia