यजमान ब्राझीलने दडपणाची तमा न बाळगता आपला खेळ उंचावत पेनल्टी शूटआऊटमध्ये चिलीवर थरारक विजय मिळवला. औपचारिकदृष्टय़ा ब्राझीलने ही लढत जिंकली, मात्र चिलीने आपल्या सर्वागसुंदर खेळाने जगभरातल्या चाहत्यांची मने जिंकली. घरच्या मैदानावर खेळत असल्याने ब्राझीलला प्रचंड पाठिंबा होता. त्या तुलनेत चिलीच्या समर्थकांची संख्या कमी होती, पण नशीब चिलीच्या बाजूने नव्हते. ब्राझीलचे खेळाडू
चिलीचा संघ मात्र अचूक अभ्यास करून उतरला होता. ब्राझीलचा बचाव कमकुवत आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी डावपेच रचले होते. अॅलेक्स सँचेझने सुरेख गोल करत हे सिद्धही केले. कागदावर ब्राझीलच्या तुलनेत चिली अननुभवी वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र चिलीचेच खेळावर नियंत्रण होते. ब्राझीलला गोल करण्यासाठी आणि चेंडूवर नियंत्रण मिळवण्यासाठी झगडावे लागत होते. ऐतिहासिक यशासाठी नशिबाची साथ मिळणे अत्यावश्यक असते. दुर्दैवाने याच मुद्दय़ावर चिलीचा संघ पिछाडीवर पडला. निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी होती. शेवटच्या काही मिनिटांमध्ये चिलीच्या मॉरूसियो पिनिलाने शानदार प्रयत्न केला, मात्र या वेळी चेंडू गोलजाळ्याच्या वरून गेला. हे अंतर अगदीच कमी होते. हा गोल झाला असता तर चिलीला आघाडी मिळाली असती. चिलीचा बचाव चांगला असल्याने ब्राझीलला तो तोडणे कठीण गेले असते, मात्र तसे झाले नाही. अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांचे खेळाडू दमले होते. चिलीने थोडासा वेळकाढूपणा केला, मात्र त्यांनी गोलसाठीचे प्रयत्न सोडले नाहीत. या टप्प्यातही त्यांनी ब्राझीलला वरचढ होऊ दिले नाही. अखेर हा मुकाबला पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.
शूटआऊट हे जुगारासारखे आहे. तुमच्या गोलरक्षकाने गोल अडवणे आणि आघाडीपटूने गोल करणे या दोन्ही गोष्टी जुळून येणे आवश्यक असते. ब्राझीलचा अनुभवी गोलरक्षक ज्युलियन सेसारने अनुभव पणाला लावत दोन किक अडवल्या. नेयमारने निर्णायक किकवर गोल करत आपले कर्तृत्व सिद्ध केले. चिलीच्या दमदार खेळामुळे अंतिम सोळामध्येच यजमान ब्राझीलवर गारद होण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले असते, मात्र ब्राझीलच्या खेळाडूंनी पेनल्टी शूटआऊटमध्ये खेळ उंचावला. चिलीच्या जाराने मारलेली किक निर्णायक ठरणार होती, पण गोलपोस्टला लागून चेंडू बाहेर पडला. त्याचा प्रयत्न अचूकच होता, मात्र नशीब त्याच्या आणि चिलीच्या बाजूने नव्हते.
साखळी फेरीनंतर जिंकणे किती कठीण आहे, याचा प्रत्यय चिलीविरुद्धच्या सामन्याने ब्राझीलला आला आहे. त्यांना पुढच्या सामन्यात कोलंबियाचा सामना करायचा आहे. चाहत्यांच्या अपेक्षांचे प्रचंड ओझे ब्राझीलच्या प्रत्येक खेळाडूवर आहे. या अपेक्षांना सकारात्मकतेत ते कसे बदलतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jun 2014 रोजी प्रकाशित
ब्राझीलने सामना, तर चिलीने मने जिंकली!
यजमान ब्राझीलने दडपणाची तमा न बाळगता आपला खेळ उंचावत पेनल्टी शूटआऊटमध्ये चिलीवर थरारक विजय मिळवला.
First published on: 30-06-2014 at 01:26 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2014 brazil win game chile win hearts