बाद फेरीनंतर शुक्रवारपासून उपांत्यपूर्व लढतींना सुरुवात होणार असल्याने आता विश्वचषकातील खरी मजा पाहायला मिळणार आहे. फुटबॉल विश्वातील लहान संघ आता स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता तुल्यबळ संघांमध्ये चुरशीचे सामने रंगतील आणि भाकीत वर्तवणे कोणासाठीही सोपे नसेल, कारण या फेरीपर्यंत पोहोचताना प्रत्येक संघाने विजय मिळवले आहेत, कडवी आव्हाने मोडीत काढली आहेत. त्यामुळे या घडीला आरपारची लढाई पाहायला मिळेल, कारण सामन्यातील एखादा क्षण पराभवासाठी पुरेसा ठरेल.
ब्राझील आणि कोलंबिया यांच्यातील सामन्याने उपांत्यपूर्व फेरीला सुरुवात होणार आहे. या सामन्यात ब्राझीलचे पारडे जड दिसत असले तरी कोलंबियाला नक्कीच कमी लेखून चालणार नाही. दोन्ही संघांच्या बाद फेरीतील कामगिरीमध्ये विरोधाभास पाहायला मिळतो. ब्राझीलला चिलीसारख्या लहान देशानेही कडवी झुंज दिली होती, तर कोलंबियाने उरुग्वेसारख्या मोठय़ा संघाला पराभूत केले आहे. कोलंबियापुढे नक्कीच ब्राझीलचे मोठे आव्हान असेल, कारण ब्राझील हा फुटबॉलमधील विकसित देश आहे, तर कोलंबिया विकसनशील. त्याचबरोबर आपल्या देशात सामना असल्याने ब्राझीलचे पारडे जड असेल, पण देशवासीयांसमोर खेळण्याचे दडपण त्यांना झुगारावे लागेल. दुसरीकडे कोलंबियाला या सामन्यात गमावण्यासारखे काहीच नाही. त्यामुळेच ते हातचे काहीही राखून न ठेवता जिंकण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करतील. ब्राझीलला अजून हवा तसा सूर गवसलेला नाही. त्यांच्या बचावामध्ये अजूनही त्रुटी आहेत. त्यांच्याकडे युवा खेळाडू आहेत, पण अनुभवी खेळाडूंची उणीव त्यांना या मोठय़ा सामन्यांमध्ये नक्कीच भासेल.
जर्मनी आणि फ्रान्स यांच्यातील सामना नक्कीच रंगतदार आणि पैसा वसूल करणारा असेल, कारण फुटबॉल विश्वातील या दोन्ही महासत्ता आहेत. आतापर्यंत विश्वचषकामध्ये दोन्ही संघांकडून चांगली कामगिरी झाली आहे आणि त्यांच्याकडे चांगला अनुभवही आहे. आतापर्यंत दोन्ही संघांपुढे मोठा संघ आला नव्हता, त्यामुळे बलाढय़ प्रतिस्पध्र्यापुढे ते पहिल्यांदा खेळतील. दोन्ही देशांचा खेळ पाहिला तर जर्मनीच्या खेळामध्ये नजाकत पाहायला मिळते. ते कधीच हवेत हल्ले करताना दिसत नाहीत. बचावपटूंकडून ते मधल्या फळीत चेंडू आणतात आणि संधी साधून आक्रमण करतात. त्यांच्याकडे तिन्ही फळ्यांमध्ये दर्जेदार खेळाडू आहेत, त्यामुळे फक्त एका खेळाडूवर त्यांच्या जय-पराजयाची शक्यता नसते. फ्रान्सचा खेळ आतापर्यंत चांगला झाला असला तरी त्यामध्ये बऱ्याच चुका होत्या. त्या चुकांवर लक्ष देण्याची आणि दुरुस्त करण्याची त्यांच्याकडे संधी असेल.
उपांत्यपूर्व फेरीमध्ये आता सारेच संघ मैदानात कर्तृत्व दाखवण्यासाठी आसुसलेले असतील, पण आता ते जुन्या रणनीतीनुसार नक्कीच उतरणार नाहीत. कारण आता तंत्रज्ञान एवढे विकसित झाले आहे की, प्रत्येक देशाचे प्रशिक्षक अन्य संघांच्या रणनीतीचा अभ्यास करत असतात. त्यामुळे नव्या रणनीतीनुसार, हातात राखून ठेवलेले पत्ते आता बाहेर काढले जातील. फ्रान्सच्या संघाने आतापर्यंत जोरदार आक्रमण केले असले तरी जर्मनीविरुद्धच्या सामन्यामध्ये ते बचावावर अधिकाधिक भर देतील, कारण जर्मनीचा संघ जोरदार आक्रमण करतो. त्यामुळे त्यासाठी फ्रान्सचा संघ बचावात्मक रणनीतीचा वापर करेल. जर्मनीकडून आतापर्यंत राखून ठेवलेल्या मिरास्लोव्ह क्लोसला खेळवण्यात येऊ शकते. नवीन खेळाडू आला की त्यानुसार खेळही बदलला जातो. त्यामुळे या सामन्यांमध्ये नावीन्यपूर्ण बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. या नवीन गोष्टींचा अवलंब जो संघ अधिक सक्षमपणे करेल, त्याला जिंकण्याची संधी जास्त असेल, पण सध्याच्या घडीला कोलंबियापेक्षा ब्राझीलचे आणि फ्रान्सपेक्षा जर्मनीचे पारडे जड वाटत आहे.
(लेखक फुटबॉल प्रशिक्षक आहेत.)