‘‘खेळण्याच्या नादात माझा तोल सुटला आणि मी इटलीच्या जॉर्जिओ चिलीएनीच्या शरीरावर आदळलो. जाणूनबुजून त्याला चावण्याचा माझा प्रयत्न नव्हता,’’ असे स्पष्टीकरण लुइस सुआरेझने दिले आहे. विश्वचषकाच्या साखळी लढतीत चिलीएनीला खांद्यावर चावल्याप्रकरणी फिफाच्या शिस्तपालन समितीने सुआरेझवर बंदी घातली होती.
‘‘त्याक्षणी माझा चेहरा चिलीएनीवर आपटल्यामुळे मला छोटीशी दुखापत झाली आणि माझ्या दातातून कळा येऊ लागल्या. मात्र कोणत्याही क्षणी चावा घेतला नाही किंवा तसा प्रयत्न केला नाही,’’ असे स्पष्टीकरण सुआरेझने फिफाच्या शिस्तपालन समितीला दिले. दरम्यान, टेलिव्हिजन दृश्यांनुसार सुआरेझ चिलीएनीला चावल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही चावण्याच्या चुकीसाठी सुआरेझला शिक्षा सुनावण्यात आली होती.
फिफाच्या समितीने सादर केलेला अहवाल प्रसारमाध्यमांच्या हाती लागला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, ‘‘प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध स्पष्टपणे गुन्हा घडला. चेंडूशी कोणताही संपर्क नसताना झालेली ही घटना जाणीवपूर्वक आणि कोणत्याही संभाषणाने किंवा हालचालीने प्रेरित नाही. प्रतिस्पर्धी खेळाडूला दुखापत होईल अशा पद्धतीने चावणे हे हेतुपुरस्सर आहे. हे कृत्य फुटबॉलच्या खेळभावनेला साजेसे नाही. खेळभावनेला बट्टा लागेल अशा स्वरूपाची ही घटना आहे.’’ दरम्यान, या घटनेनंतर आपल्याला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे सुआरेझने आभार मानले आहेत.