पिवळी जर्सी परिधान करून जेव्हा हे दोन्ही दक्षिण अमेरिकेतील देश मैदानात उतरतात, तेव्हा स्टेडियम हळदीने न्हाहून निघते.. मैदानातील दमदार कामगिरी आणि प्रेक्षकांचा जल्लोष हे त्यांच्या सामन्यांचे वैशिष्टय़ होते.. यापैकी ब्राझीचे नाव फुटबॉल क्षेत्रात मोठे, पण त्यांच्या दर्जाला साजेसा खेळ अद्याप रसिकांना पाहायला मिळालेला नाही.. तर दुसरीकडे कोलंबियाचे नाव बऱ्याच जणांच्या खिजगणतीतही नव्हते. परंतु तरीही त्यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली.. आता हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले असून या सामन्यात ब्राझीलचा संघ बाजी मारणार की एकामागून एक धक्के देणारा कोलंबियाचा संघ विश्वचषकातील मोठा धक्का देणार, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल. एकीकडे ब्राझीलचा संघ नेयमारवर अवलंबून असेल तर दुसरीकडे कोलंबियाच्या संघाला जेम्स रॉड्रिगेझकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असेल.
ब्राझीलने साखळी फेरीमध्ये चांगली कामगिरी करीत बाद फेरीत पोहोचताना अव्वल स्थान पटकावले खरे, पण बाद फेरीच्या सामन्यामध्ये चिलीपुढे ब्राझील हतबल झाल्याचे चित्र होते. नेयमार, फ्रेड, हल्क या नावाजलेल्या खेळाडूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती, त्याचबरोबर थिआगो सिल्व्हा आणि अन्य बचावपटूंना चिलीच्या खेळाडूंना रोखता आले नव्हते. त्या सामन्यामध्ये फक्त दैव बलवत्तर म्हणून ब्राझीलला विजय मिळाला होता, पण दैवाच्या भरवशावर ब्राझीलला प्रत्येक सामन्यामध्ये राहता येणार नाही. त्यामुळे या सामन्यासाठी तयारी करताना ब्राझीलला आक्रमण आणि बचाव या दोन्ही गोष्टींवर अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याबरोबर नेयमारला दुखापत झाली असून तो पूर्णपणे तंदुरुस्त नसेल, तर ब्राझीलसाठी कोलंबियाचे आव्हान नक्कीच खडतर असेल.
कोलंबियाच्या संघातील दोन व्यक्ती प्रकाशझोतात आल्या आहेत. आतापर्यंत विश्वचषकामध्ये सर्वाधिक पाच गोल करीत जेम्सने आपली क्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे तो ब्राझीलच्या रडारवर अग्रस्थानी असेल. कोलंबियाच्या संघातील दुसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे प्रशिक्षक जोस पेकेरमन. आतापर्यंत पेकेरमन यांनी खेळताना प्रत्येक वेळी संघानुसार रणनीती बदलल्या असून त्यामध्ये त्यांना यशही मिळाले आहे. साखळी सामन्यांमध्ये त्यांनी ४-२-३-१ पासून ४-१-४-१ पर्यंत वेगवेगळ्या रणनीती वापरल्या आहेत, तर उरुग्वेविरुद्धच्या बाद फेरीतील सामन्यांमध्ये त्यांनी ४-२-२-२ हा रणनीती वापरली होती. त्यामुळे मैदानात जर एक रणनीती यशस्वी होत नसेल तर त्यांच्याकडे बरेच पर्याय उपलब्ध असतील. जेम्सकडून जर अपेक्षित कामगिरी होत नसेल तर पाबलो आर्मेरो आणि जुआन झुनिगा यांना आक्रमणासाठी पाठवण्यात येऊ शकते.
ब्राझीलच्या संघाला अजूनपर्यंत अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यांच्या आक्रमणामध्ये हवी तशी धार दिसलेली नाही, तर बचावामध्येही बऱ्याच त्रुटी असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे कोलंबियाचे आक्रमण चांगले होत असले तरी ते मुख्यत्वेकरून जेम्सवर अवलंबून आहेत, पण जर जेम्सला अपेक्षित कामगिरी करता आली नाही तर काय होणार, याचे उत्तर त्यांच्याकडे असायला हवे. दुसरीकडे त्यांचा बचावही सक्षम नसल्याचे दिसून आले आहे. दोन्ही संघांचा विचार करता कोलंबियापेक्षा ब्राझीलचे पारडे थोडेसे जड आहे. पण कोलंबियाकडे ब्राझीलला पराभूत करण्याची धमकही आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल.
ब्राझील वि. कोलंबिया
स्थळ : इस्टाडिओ कॅसेलाओ ल्ल वेळ : मध्यरात्री १.३० वा. पासून
सामना क्र. ५७
२२ वर्षांचा जेम्स रॉड्रिगेझ हा गुणवान खेळाडू आहे. विश्वचषकात त्याची कामगिरी लक्षणीय झालेली आहे. त्यामुळे कोलंबियाचा तो आधारस्तंभ असेल. चिलीविरुद्धच्या सामन्यातून आम्ही बरेच काही शिकलो असून कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात सुधारणा पाहायला मिळेल.
-नेयमार, ब्राझीलचा खेळाडू
आतापर्यंत संघाने दमदार कामगिरी केली असून यजमान ब्राझीलशी दोन हात करायला आम्ही सज्ज आहोत. आतापर्यंत आम्ही बऱ्याच रणनीती वापरल्या आहेत, त्यामुळे या सामन्यात फक्त एका रणनीतीसह नक्कीच उतरणार नाही. खेळात वेळोवेळी बदल केले जातील. ब्राझीलला धक्का द्यायला आम्ही सज्ज झालो आहोत.
जोस पेकरमन, कोलंबियाचा प्रशिक्षक
मॅच फॅक्ट्स
ब्राझील
* गेल्या चार सामन्यांमध्ये ब्राझीलने कोलंबियाला पराभूत केले आहे.
* विश्वचषकामध्ये गेल्या २२ सामन्यांपैकी ब्राझीलने २० सामने ते हरले नाहीत.
कोलंबिया
* या विश्वचषकात कोलंबियाने गेले चारही सामने जिंकले आहेत.
* विश्वचषकातील गेल्या सहा
सामन्यांमध्ये कोलंबियाने किमान दोन गोल केले आहेत.