बेल्जियमची ३-२ अशी मात; हरमनप्रीतच्या ढिसाळपणाचा फटका

भारताने जगज्जेत्या बेल्जियमला विजयासाठी संघर्ष करायला लावला खरा, पण हरमनप्रीत सिंगने बचावात केलेल्या ढिसाळ कामगिरीमुळे यजमान भारताला ‘एफआयएच’ प्रो हॉकी लीगमध्ये पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.

दुसऱ्या सत्रात २-२ अशी बरोबरी साधत भारताने बेल्जियमला चोख प्रत्युत्तर दिले होते. पण हरमनप्रीतकडून झालेल्या चुकीचा फायदा उठवत बेल्जियमने सामन्यात तिसरा गोल केला आणि याच गोलच्या जोरावर भारताला ३-२ असे नमवून शनिवारच्या पराभवाची परतफेड केली.

भारताने नेदरलँड्सविरुद्ध सरशी साधली होती. त्यानंतर शनिवारी बेल्जियमला २-१ असे हरवत भारताने विजयी परंपरा कायम ठेवली होती. पण रविवारी भारतीय संघाला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. अलेक्झांडर हेंड्रिक्स याने तिसऱ्या मिनिटाला गोल करत या सामन्यात खाते खोलले होते. त्यानंतर विवेक सागर प्रसाद (१५व्या मिनिटाला) याने  मैदानी गोलद्वारे सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली होती. पण मॅक्सिम प्लेनावॉक्सने १७व्या आणि २६व्या मिनिटाला दोन गोल करून बेल्जियमला विजय मिळवून दिला. अमित रोहिदासने १७व्या मिनिटाला बरोबरी साधणारा गोल केला होता.

या विजयामुळे बेल्जियमने सहा सामन्यांतून १४ गुणांसह अग्रस्थान पटकावले आहे. भारताने चार सामन्यांत आठ गुणांची कमाई करत दुसरे स्थान प्राप्त केले आहे. भारताकडून पराभूत झालेला नेदरलँड्स चार सामन्यांतून ७ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

बेल्जियमने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत भारतावर दडपण आणले. याचाच फायदा उठवत हेंड्रिक्सने पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल केला. त्याआधी सेबॅस्टियन डॉकियर आणि थॉमस ब्राएल्सने केलेले प्रयत्न भारताचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने हाणून पाडले. पहिल्या सत्राच्या अखेरीस सुरेंद्रकुमारच्या सुरेख कामगिरीवर कळस चढवत विवेक प्रसादने अप्रतिम गोल साकारला. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच प्लेनावॉक्सने बेल्जियमला आघाडीवर आणले. पण ३० सेकंदांतच चोख प्रत्युत्तर देत अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला.

मध्यंतराला तीन मिनिटांचा खेळ शिल्लक असताना हरमनप्रीतने बचावात मोठी चूक करत बेल्जियमला गोल करण्याची संधी दिली. याचा फायदा उठवत प्लेनावॉक्सने सामन्यातील दुसरा आणि तिसरा गोल लगावत बेल्जियमला पुन्हा एकदा आघाडीवर आणले. त्यानंतर भारताने उर्वरित दोन्ही सत्रात गोल करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.