क्रिकेटपटू गौतम गंभीरने सुकमातील नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांना दत्तक घेतले असतानाच आता भारताच्या माजी हॉकीपटूनेही रोहतकमधील २१ मुलींना दत्तक घेतले आहे. सहावी ते बारावी या इयत्तेतील २१ मुलींना या हॉकीपटूने दत्तक घेतले असून या मुलींच्या शिक्षणाचा आणि क्रीडा प्रशिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे.

रोहतक जिल्ह्याल बोहार गावातील रहिवासी आणि माजी हॉकीपटू अजितपाल नंदाल यांनी गावातील २१ मुलींना दत्तक घेतले आहे. सहावी ते बारावी इयत्तेतील या मुलींचा बारावीपर्यंतचा खर्चही ते उचलणार आहेत. तसेच त्यांना क्रीडा प्रशिक्षणही दिले जाईल. त्यांच्या खेळासाठी लागणारे साहित्य, स्पर्धेच्या तयारीसाठीचा खर्चही नंदाल करणार आहेत. नंदाल यांची स्वत:ची जिम असून गावातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या आणि क्रीडा क्षेत्रात रस असलेल्या विद्यार्थिनींना जिममध्ये मोफत व्यायाम करण्याची मुभा असेल अशी घोषणाही नंदाल यांनी केली आहे.

नंदाल यांना मुलींना दत्तक घेण्याची प्रेरणा गौतम गंभीरकडून मिळाली. २०२० च्या ऑलिम्पिकच्या तयारीसाठी केंद्र सरकारच्या टास्क फोर्समध्येही नंदाल यंचा समावेश आहे. नंदाल यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात रोहतकचे पोलीस अधीक्षक पंकज जैन हेदेखील उपस्थित होते. मुलांपेक्षा मुलींमध्ये क्षमता जास्त असून त्या सर्व क्षेत्रात पुढे जाऊ शकतात. क्रीडा क्षेत्रासाठी पालकांनी मुलींमधून गूण हेरुन त्यादिशेने तिला प्रशिक्षण दिले पाहिजे असे जैन यांनी सांगितले.