Dale Steyn Cried After South Africa Historic Win: दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील फायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करत इतिहासाला गवसणी घातली आहे. गेल्या २७ वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नव्हती. मात्र, यावेळी तेंबा बावूमाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने पराभवाची मालिका मोडून काढत जेतेपदावर नाव कोरलं आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेला चोकर्स म्हटलं जायचं. मात्र, यावेळी दक्षिण आफ्रिकेने दाखवून दिलं आहे की, आम्ही चोकर्स नाही चॅम्पियन आहोत.या ऐतिहासिक विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज डेल स्टेन भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या ऐतिहासिक विजयानंतर स्टार स्पोर्ट्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये डेल स्टेन भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याला अश्रू अनावर झाले आहेत. स्टेन आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाला, “हे अविश्वसनीय आहे. मी घरी आहे, माझी कॅप माझ्याकडे आहे. मला खूप अभिमान वाटतोय.”या भावना व्यक्त करताना स्टेनला अश्रू अनावर झाले.
दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय
लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून एडन मारक्रमने दमदार सुरूवात करून दिली. दक्षिण आफ्रिकेला डावाच्या सुरूवातीलाच पहिला धक्का बसला. रायन रिकल्टन अवघ्या ६ धावांवर तंबूत परतला. पण त्यानंतर मारक्रम आणि मुल्डर यांनी मिळून संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली आणि दक्षिण आफ्रिकेला सामन्यात कमबॅक करून दिलं. त्यानंतर कर्णधार तेंबा बावूमा आणि मारक्रमने मिळून १५० हून अधिक धावांची भागीदारी करत सामना एकतर्फी केला.
तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना तेंबा बावूमा अर्धशतकी तर मारक्रम शतकी खेळी करून नाबाद माघारी परतले. दक्षिण आफ्रिकेला चौथ्या दिवशी विजयासाठी अवघ्या ६९ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना तेंबा बावूमा ६६ धावा करत माघारी परतला. तर मारक्रम विजयाच्या अगदी जवळ असताना १३६ धावांवर माघारी परतला. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.
दक्षिण आफ्रिका क्रिकेटसाठी हा खूप मोठा क्षण होता. त्यामुळे खेळाडू भावूक होणं साहजिक होतं. या विजयानंतर केवळ डेल स्टेनला अश्रू अनावर झाले असं नाही. तर संघातील अष्टपैलू खेळाडू केशव महाराजला देखील रडू आलं. सामन्यानंतर माजी खेळाडू ग्रॅमी स्मिथला मुलाखत देत असताना केशव महाराज आपल्या भावना व्यक्त करण्यापासून स्वत:ला थांबवू शकला नाही. त्याने रडत रडत मुलाखत दिली आणि आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.