Australian Players Fell ill After Eating Chicken In Kanpur: ऑस्ट्रेलियाचा अ संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारतीय अ आणि ऑस्ट्रेलिया अ या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी पार पडला. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर एकतर्फी विजयाची नोंद केली होती. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. दरम्यान दुसऱ्या सामन्यानंतर एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचे ४ खेळाडू कानपूरमध्ये चिकन खाऊन आजारी पडले आहेत.
माध्यमातील वृत्तानुसार, ऑस्ट्रेलिया अ संघातील खेळाडूंबाबत मोठी माहिती समोर येत आहे. एका नावाजलेल्या पत्रकाराने एक्स अकाऊंटवर असा दावा करणारी पोस्ट शेअर करण्यात आली आहे की, ऑस्ट्रेलिया अ संघातील ४ खेळाडू हॉटेलचं जेवण खाऊन आजारी पडले आहेत. त्यामुळे खेळाडूंना रूग्णालयात दाखल करावं लागलं आहे.
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अचानक आजारी पडले
ऑस्ट्रेलिया अ संघातील खेळाडू हेनरी थॉर्नटनला कानपूरच्या रेजेंसी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, या चौघांनी कानपूरमध्ये चिकन खाल्ले होते. पण हे चिकन चौघांनाही पचलेलं नाही. खेळाडूंना पोटदुखीचा त्रास झाला. हेनरी थॉर्नटनला टीम मॅनेजमेंटच्या मदतीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा विजय
या मालिकेतील दुसरा सामना कानपूरमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय अ संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा डाव ४५.५ षटकात अवघ्या २४६ धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना तिलक वर्माने सर्वाधिक ९४ धावांची खेळी केली. त्याचं शतक थोडक्यात हुकलं. तर रियान परागने ५८ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने दमदार डकवर्थ लुईस नियमानुसार ९ गडी राखून विजयाची नोंद केली. यासह मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे.