इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघनिवड आज; सलामीच्या भूमिकेसाठी लोकेश राहुल, धवनसह गौतम गंभीरही शर्यतीत

आजारपणातून पूर्णपणे सावरलेला गोलंदाज इशांत शर्मा भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी मुंबईत बुधवारी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. सलामीच्या जागेसाठी तिरंगी किंवा चौरंगी शर्यत पाहायला मिळेल. ‘भारतीय संघाची बुधवारी मुंबईत निवड करण्यात येईल़,’ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली.

भारताने नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० असे निभ्रेळ यश मिळवले होते. तरीही इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत संघ निवडताना निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद काही फेरबदल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत दुखापतीमुळे सलामीवीर लोकेश राहुल आणि चिकनगुनियामुळे इशांत शर्मा यांना मुकावे लागले होते आणि त्यामुळे कोलकाता कसोटीत गौतम गंभीर आणि जयंत यादव यांना संघात स्थान देण्यात आले. गंभीरला कोलकाता कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही, परंतु शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे इंदूर कसोटीत गंभीरला खेळण्याची संधी मिळाली. धवनऐवजी संघात स्थान मिळालेल्या करुण नायरला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नाही.

मात्र, दोन वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या गंभीरने इंदौर कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावून निवड समितीला विचार करण्यास भाग पाडले आहे. गंभीरने रणजी स्पध्रेत ओडिशाविरुद्ध १४७ धावांची खेळी करून आपले नाणे खणखणीत केले आहे, परंतु राहुल आणि धवन पूर्णपणे तंदुरुस्त असल्यास त्याला संधी मिळणे अवघड होईल. इशांतही आजारपणातून बरा झाला असून दोन रणजी सामन्यांत त्याने जवळपास ४० षटके टाकली होती. इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सर्वोत्तम संघ निवडण्याची कसोटी निवड समितीला पार पाडावी लागेल. राहुल आणि भुवनेश्वर कुमार यांनी दुखापतीनंतर एकही सामना खेळलेला नाही आणि त्यांना तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे. धवनलाही याच परीक्षेतून जावे लागणार आहे.