Gautam Gambhir: भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना होत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारत १८६ धावांची आघाडी घेतली. दिवसअखेर इंग्लंडच्या संघाने ७ बाद ५४४ धावा केल्या. २०२१ नंतर भारताने पहिल्यांदाच कसोटी सामन्यात एखाद्या संघाला ५०० हून अधिक धावा दिल्या आहेत. भारताचा पहिला डाव ३५८ धावांवर आटोपल्यानंतर भारतीय खेळाडू काहीसे गोंधळलेले दिसत आहेत. भारतीय संघाच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरीनंतर आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना क्रिकेट चाहते लक्ष्य करत आहेत.

तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांवर अंकुश लावण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरल्यानंतर टीका होत आहे. जो रूटने शतक (१५०) झळकावत सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा क्रमांक पटकावला. तो बाद झाल्यानंतर कर्णधार बेन स्टोक्सने लियाम डॉसनच्या (२१ धावा) साथीने ७७ धावा केल्या असून तो नाबाद आहे. अद्यापती तीन विकेट हाी असल्यामुळे इंग्लंड आघाडी घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चाहत्यांची गौतम गंभीरवर टीका

दरम्यान ही कसोटी मालिका भारताच्या हातातून निसटण्याची चिन्ह दिसू लागल्यानंतर आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला लक्ष्य करण्यात येत आहे. गंभीरच्या रणनीतीवर शंका उपस्थित करत त्याच्यावर टीका केली जात आहे. काही चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत थेट गंभीरच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मुदीत जैन नावाच्या एका युजरने म्हटले, “गौतम गंभीरने लाथ मारून बाहेर काढण्याची वाट न पाहता मालिकेच्या मध्यातूनच मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा द्यावा. आपल्या सर्वांना माहीत आहे की, या दोन पर्यायांपैकी काहीही होणार नाही. तरी या व्यावहारिक विचाराकी कितीजण सहमत आहेत?”

दुसऱ्या एका युजरने म्हटले, “गौतम गंभीर तुमच्यात स्वाभिमान असेल तर इंग्लंडच्या कसोटी मालिकेनंतर तुम्ही स्वतःहून राजीनामा द्याल.” आणखी एका चाहत्याने लिहिले की, विराट कोहलीला परत आणायला हवे.

तर जैन यांच्याप्रमाणेच प्रतीक तुलसानी नावाच्या एका युजरनेही राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याने म्हटले, गौतम गंभीरसाठी एक चांगला सल्ला देतो. तुम्हाला काढून टाकण्याआधीच तुम्ही बाजूला व्हा. कसोटी मालिकेसाठी प्रशिक्षक म्हणून तुम्ही अपयशी ठरला आहात.

राजीव नाव असलेल्या युजरने तर गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून कसोटी मालिकेतील भारताच्या कामगिरीचा आलेख दिला आहे. गौतम गंभीर प्रशिक्षक असताना भारताने १२ कसोटी सामन्यापैंकी ९ सामने गमावले आहेत. तर लागोपाठ तीन मालिका गमावल्या आहेत. मागच्या ३० वर्षांत भारतीय क्रिकेटमध्ये अशी लाजिरवाणी कामगिरी झाली नव्हती.

मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी काय घडलं?

मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पायाला दुखापत झालेली असतानाही भारताचा यष्टीरक्षक फलंदाज पुन्हा फलंदाजी उतरला. यासह भारतीय संघ पहिल्या डावात ३५८ धावा करत सर्वबाद झाला. यानंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी प्रत्युत्तरात बॅझबॉल शैलीत फटकेबाजी करत वेगाने धावा केल्या. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी १५० अधिक धावांची भागीदारी रचली. तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली तेव्हा मैदानात जो रूट आणि ऑली पोपची जोडी खेळत होती.